सांडपाणी प्रकल्प उरकण्याची घाई

रस्ते पूर्ववत करण्यास दिरंगाई; रहदारीस अडथळा

| माथेरान | वार्ताहर |

माथेरान मधील सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी एसटीपी कामे सध्या युद्धपातळीवर सुरु आहेत. माथेरान मधील वस्तीच्या दृष्टिकोनातून एक महत्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे.या कामात वन खात्याला विचारात घेतल्याचे दिसत नाही. ठेकेदाराने अद्यापही कमी व्यासाची जेमतेम सहा इंचाचे पाईप सांडपाणी वाहून नेण्यासाठी लावण्यात येत आहेत.खूपच जलदगतीने बिले काढण्यासाठी एवढ्या घाईगडबडीत रस्त्याचे क्ले पेव्हर ब्लॉक्स काढून रस्ते खोदण्याची कामे सुरु आहेत.ज्या ठिकाणी हे ब्लॉक्स काढण्यात आलेले आहेत. ते रस्ते सुद्धा पूर्ववत केलेले नसल्यामुळे रहदारीला खूपच अडचणी निर्माण होत असून चोवीस तास रुग्णांना सेवा देणाऱ्या तसेच प्रतिष्ठित मंडळींना दस्तुरी नाक्यावर नेण्यासाठी रुग्णवाहिका चालकांना त्रासदायक ठरत आहे.

या माध्यमातून जरी सांडपाण्याचा निचरा केला जाणार असला तरीसुद्धा ज्याठिकाणी ह्या सांडपाण्याचा साठा केल्यानंतर त्या पाण्यावर प्रक्रिया केल्यानंतर त्या पाण्याचे शुद्धीकरण करून अन्यत्र गार्डन अथवा झाडा झुडपांच्या वापरासाठी आवश्यक जागा अद्यापही उपलब्ध करण्यात आलेली नसून गावातील ज्या ठिकाणी ह्या सांडपाण्याचा साठा केला जाणार आहे ती जागा निश्चित केल्याचे दिसत नाही. निदान खोदकाम केल्यावर रस्त्याचे ब्लॉक्स पूर्ववत लावावे अशी मागणी होत असुन चुकीच्या पद्धतीने आणण्यात आलेले हे सांडपाण्याचे पाईप दहा ते बारा इंच व्यासाचे लावण्यात यावेत जेणेकरून भविष्यात कमी व्यासाच्या पाईप फुटल्यावर पुन्हा रस्त्यांची खोदाई करून रस्त्याची अवस्था दयनीय होण्यापूर्वीच कामाच्या आरखड्यात बदल करावा. अन्यथा स्थानिकाना भविष्यात अनेक अडचणींना सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Exit mobile version