| नवी दिल्ली | वृतसंस्था |
लोकसभा निवडणुकीची काही दिवसांत घोषणा होणार असतानाच निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी शनिवारी तडकाफडकी राजीनामा दिला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर गोयल यांनी दिलेला राजीनामा मोदी सरकारसाठी मोठा धक्का मानला जात आहे. देशाच्या निवडणूक आयोगात मुख्य निवडणूक आयुक्तांसह दोन आयुक्त असतात. त्यापैकी एक आयुक्त पद आधीच रिक्त होते. त्यातच गोयल यांनी राजीनामा दिल्यामुळे आता निवडणूक आयोगाची धुरा केवळ मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या खांद्यावर आली आहे. गोयल यांनी (दि.18) नोव्हेंबर 2022 रोजी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. नंतर एका दिवसातच त्यांची निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या नियुक्तीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. त्यांचा कार्यकाळ संपायला तीन वर्षे बाकी असतानाच शनिवारी त्यांनी राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ते मुख्य निवडणूक आयुक्त बनण्याच्या शर्यतीत होते.