14 पदकांसह भारत पहिल्या स्थानी
| बगदाद | वृत्तसंस्था |
भारतीय तिरंदाजांनी आशियाई करंडकात (लेग वन) पदकांची लयलूट केली. भारतीय तिरंदाजांनी लक्ष्याचा अचूक वेध घेत एकूण 14 पदकांवर मोहर उमटवली आणि पदकतालिकेत पहिल्या स्थानावर मुसंडी मारली. भारतीय तिरंदाजांनी नऊ सुवर्ण, चार रौप्य व एक ब्राँझपदकावर नाव कोरत आपले वर्चस्व प्रस्थापित केले. महाराष्ट्राच्या प्रथमेश जावकर याने या स्पर्धेमध्ये तीन सुवर्णपदकांची माळ आपल्या गळ्यात घातली हे विशेष.
भारतीय तिरंदाजांनी शनिवारी कंपाऊंड पुरुष सांघिक व मिश्र सांघिक या दोन्ही प्रकारात सुवर्णपदक पटकावले होते. तसेच, कंपाऊंड महिला सांघिक प्रकारात रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. रविवारी भारताच्या तिरंदाजांनी सहभागी सर्व प्रकारात सुवर्णपदकांवर हक्क सांगून निर्भेळ व घवघवीत यशाला गवसणी घातली. पुरुषांच्या रिकर्व्ह प्रकारात धीरज बी. याने भारताच्याच तरुणदीप रायला पराभूत करीत सुवर्णपदक जिंकले. महिलांच्या रिकर्व्ह प्रकारात दीपिका कुमारीने सिमरनजीत कौर हिला नमवत सुवर्णपदक जिंकले. बाळंतपणानंतर दीपिका कुमारीने झोकात पुनरागमन केले. या दोन्ही प्रकारात भारतीय खेळाडूंना रौप्यपदके मिळाली.
महाराष्ट्राच्या खेळाडूंचे यश या स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार्या प्रथमेश जावकर, प्रवीण जाधव व अदिती स्वामी या तीन खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली. प्रथमेश जावकर याने अदिती स्वामी हिच्या साथीने कंपाऊंड मिश्र प्रकारात सुवर्णपदक जिंकले. तसेच कंपाऊंड पुरुषांच्या सांघिक प्रकारातही सुवर्णपदक पटकावले. महाराष्ट्राच्या या पठ्ठ्याने रविवारी कंपाऊंड पुरुषांच्या प्रकारात भारताच्याच कुशल दलाल याला पराभूत करताना सुवर्णपदकाची हॅट्ट्रिक साजरी केली. महाराष्ट्राच्याच प्रवीण जाधव याने तरुणदीप राय व धीरज बी. याच्या साथीने रिकर्व्ह पुरुषांच्या सांघिक प्रकारात बांगलादेशच्या खेळाडूंना पराभूत करीत सुवर्णपदक आपल्या नावावर केले.
परनीतला गोल्ड महिलांच्या कंपाऊंड प्रकारात भारताच्या परनीत कौर हिने फेतमेह हेमती हिला पराभूत करताना सुवर्णपदक जिंकले. महिलांच्या सांघिक रिकर्व्ह प्रकारात सिमरनजीत कौर, भजन कौर व दीपिकाकुमारी या भारतीय महिलांनी पहिला क्रमांक पटकावला. रिकर्व्ह मिश्र प्रकारात धीरज बी. व सिमरनजीत कौर यांनी सुवर्णपदक पटकावले.