केरळचा 232 धावांनी धुव्वा
| मुंबई | वृत्तसंस्था |
मुंबईच्या क्रिकेट संघाने सोमवारी रणजी करंडकातील यंदाच्या मोसमातील सलग तिसरा विजय नोंदवला. शम्स मुलानीच्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर मुंबईने केरळचा दुसरा डाव 94 धावांमध्ये आटोपला. मुंबईने 232 धावांच्या दणदणीत विजयासह 20 गुणांची कमाई करताना ब गटात आपले अव्वल स्थान कायम राखले. केरळचा संघ चार गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. पहिल्या डावात 57 धावा देत सात फलंदाज बाद करणारा तनुष कोटियन या सामन्याचा मानकरी ठरला.
मुंबईने पहिल्या डावात 251 धावा केल्यानंतर प्रत्युत्तर देणार्या केरळला पहिल्या डावात 244 धावाच करता आल्या. मुंबईने दुसर्या डावात 319 धावा फटकावल्या. त्यामुळे केरळ संघासमोर विजयासाठी 327 धावांचे आव्हान उभे ठाकले. केरळच्या संघाने तिसर्या दिवसअखेरीस बिनबाद 24 धावा केल्या होत्या.
सोमवारी त्यांनी पुढे खेळायला सुरुवात केली; मात्र शम्स मुलानीच्या फिरकीचा त्यांना सामना करता आला नाही. त्यांचा डाव 94 धावांवरच गारद झाला. मुलानी याने 44 धावा देत निम्मा संघ गारद केला. धवल कुलकर्णी व तनुष कोटियन यांनी प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले. केरळकडून रोहन कुन्नुमल याने सर्वाधिक 26 धावा केल्या.
पहिल्या तीन लढतींनंतर मुंबईचा संघ ब गटात अव्वल स्थानावर आहे. आता त्यांचा चौथा सामना उत्तर प्रदेशशी होणार आहे. 26 जानेवारीपासून मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात येणार आहे. उत्तर प्रदेशला या मोसमात अद्याप विजय मिळवता आलेला नाही. पहिल्या तीनही लढती अनिर्णित राहिलेल्या आहेत.
संक्षिप्त धावफलक मुंबई-पहिला डाव सर्व बाद 251 धावा आणि दुसरा डाव सर्व बाद 319 धावा. विजयी वि. केरळ-पहिला डाव सर्व बाद 244 धावा व सर्व बाद 94 धावा (रोहन कुन्नूमल 26, जलाज सक्सेना 16, संजू सॅमसन नाबाद 15, शम्स मुलानी 5/44, तनुष कोटियन 2/6, धवल कुलकर्णी 2/32). सामनावीर-मोहित अवस्थी (7/57 व 32 धावा).