स्विमिंग पुलमधील मस्ती पडली महागात

दिवेआगर येथील पर्यटकाला दुखापत; दारुच्या नशेत घडला प्रकार
। श्रीवर्धन । प्रतिनिधी ।

पुण्यातील आयटी कंपनीतील काही मित्रांचा ग्रुप हा मे महिन्यात दिवेआगर येथे फिरायला आला होता. मात्र दारू पिऊन स्विमिंग पुलमधील मौज मस्ती ही एकाला कायमस्वरूपी दुखापत देऊन गेली आहे. याबाबतीत दिघी सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल झाला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 14 मे रोजी पुण्यातील काही मित्रांचा ग्रुप हा दिवेआगर येथील सोहम गेस्ट हाऊसमध्ये आला होता. घटनेच्या दिवशी फिर्यादी श्रेयस आचवल यांना त्यांचे मित्र ध्रुव धामणे याने उचलून स्विमिंगमध्ये ढकलले व इतर दोन मित्र सुरज कुमार व मिताली आंबेकर यांनी धृव याला फिर्यादीच्या अंगावर ढकललं. यात फिर्यादीच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली. दिवेआगर येथून मौजमजा करून पुण्याला गेल्यावर या गंभीर आजाराचे निदान झाले व डॉक्टरांनी पूर्णपणे बेडरेस्ट करण्याचा सल्ला दिला. फिर्यादी श्रेयस आचवल व पत्नी यांनी महिन्यानंतर दिघी सागरी पोलिस ठाण्यात येऊन इतर तीन मित्रांविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी ध्रुव, सुरजकुमार व मिताली यांच्यावर दुखापतीस कारणीभूत व झालेल्या दुखापतीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

पर्यटक होते फुल्ल !
या घटनेत पर्यटक हे दारू प्यायले असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे दारूच्या नशेत अधिक मस्ती झाली असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. दिवेआगरमध्ये रिसॉर्ट वर गुपचूप दारू विकली जातेय व पर्यटकांना सोयीने ती उपलब्ध होते. याकडे पोलिसांनी लक्ष देण्याची मागणी होते.

Exit mobile version