ग्रामस्थांसह भक्तगणांची नाराजी
| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरुड आगरदांडा अंतर्गत रस्त्यांवर मोठे खड्डे पडल्याने गौरी गणपती बाप्पाचे विसर्जनाकरिता या खड्ड्यातून जावं लागल्याने ग्रामस्थांसह भक्तगणांनी नाराजी दर्शवली आहे.
मुरुड तालुक्यातील आगरदांडा ग्रामपंचायत हद्दीतील अंतर्गत रस्ता गेले 15 वर्षांपासून नव्याने बनला नसल्याने या रस्त्यावर खड्डेचखड्डे पडायला लागले आहेत. या रस्त्यावरुन पादचारी व वाहनचालकांना गाडी चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. तरीही ग्रामपंचायतीचे या रस्त्याकडे दुर्लक्ष होत असून रस्त्यावरचे खड्डे मोठ्या प्रमाणात होऊ लागले आहेत.
कोकणात गणेशोत्सव सर्वात मोठा सण. या दिवशी प्रत्येकांच्या घरी गणपती बाप्पांचे आगमन होत असते. हे माहित असूनसुद्धा ग्रामपंचायतीकडून रस्त्यावर पडलेले खड्डे डांबर व खड्डी टाकून बुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला नाही. त्यामुळे गौरी गणपती विसर्जनाकरिता निघालेल्या गणेशभक्तांना या खड्ड्यातून मार्ग शोधावा लागल्याने ग्रामस्थांसह भक्तगणांनी नाराजी दर्शवली आहे. तीन दिवसांनी अनंत चतुर्थीचे गणपती बाप्पांचे विसर्जन होणार आहे. त्याआधी ग्रामपंचायतीकडून रस्तावरचे खड्डे बुजवावे, अशी मागणी भक्तगणांनी केली आहे.
आगरदांडा सरपंच आशिष हेदुळकर यांना या संदर्भात विचारणा केली असता ते म्हणाले की, गणपती बाप्पांच्या आगमनच्या आधी रस्त्यावरचे खड्डे बुजवावे असे ग्रामसभे ठरले होते हे खरे आहे. त्याप्रमाणे रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविलेही गेले; एकदा नाही तर तिनदा खड्डे बुजवले. पहिले चिकट बुरुम टाकून तर दोनदा कॉरलेस टाकून बुजविण्याचं प्रयत्न केला. परंतु, सतत जोरदार पावसामुळे खड्ड्यात टाकलेली बुरुम व कॉरलेस वाहून गेल्याने पुन्हा खड्डे दिसू लागले आहेत. तसेच, हा रस्ता मेरीटाईम बोर्डाच्या अंतर्गत असल्याने हा रस्ता मेरीटाईम बोर्डाकडून बनवला जाईल. हा रस्ता नव्याने बनविण्यासाठी ग्रामपंचायतकडून मेरीटाईम बोर्डाकडे अनेक निवेदन देण्यात आली आहे. परंतु, मेरीटाईम बोर्डाकडून कोणाताही रिप्लाय आला नाही. हा रस्ता नव्याने होण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, अशी प्रतिक्रिया आगरदांडा सरपंच आशिष हेदुळकर यांनी दिली.
