| आंबेत | वार्ताहर |
कोकण विभागामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड या तीन जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळला. रायगड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पाऊस हा म्हसळा तालुक्यात झाला असून, 204 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली.
त्यामुळे म्हसळा शहरासह तालुक्यातील इतर गावांनादेखील या पावसाचा फटका बसला. तालुक्यातील बाजूलाच असणार्या ढोरजे गावाकडे जाणारा पूलदेखील पावसाच्या पाण्याखाली गेल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला होता. घोणसे माणगाव राष्ट्रीय महामार्गावरील घाटामध्ये देखील मोठ्या प्रमाणात दरड आल्याने येथील वाहतूक पूर्णपणे ठप्प पडली होती. लोणेरे गोरेगाव मार्गावरदेखील मोठे झाड पडल्याने या मार्गावरची वाहतूक मोरबेमार्गे वळवण्यात आली होती. त्यामुळे म्हसळा शहराकडे येणारा संपूर्ण प्रवास हा या मुसळधार पावसाने सोमवारी अडवून धरला होता. म्हसळा शहराचीदेखील या पावसात दैना उडाली होती. या पावसात शहराच्या मुख्य प्रवेशद्वारावर पेट्रोल पंपाशेजारी पाणी साचल्याने येथील प्रवाशांची आणि नागरिकांची दैना उडाली. तर दुसरीकडे म्हसळा शहराजवळून वाहणारी जानसई नदीदेखील दुथडी भरून वाहत आहे, त्यामुळे आणखीन पावसाचा जोर कायम राहिला तर ही नदीदेखील आपली पातळी ओलांडून पूरपरिस्थिती निर्माण करण्याची दाट शक्यता आहे. तालुक्यात अद्याप कोणतीही नुकसानी झाली नसली तरी आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.