| पनवेल । वार्ताहर |
रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांचा सुळसुळाट झाला आहे. स्थानकाच्या प्रवेशद्वारापासून मोकळ्या असलेल्या प्रत्येक जागेवर रेडिमेड कपडे, मोबाईल कव्हर, भेळ, चपला, खेळण्यांसह भाजीविक्रेत्यांनी बेकायदा व्यवसाय थाटले असल्यामुळे प्रवासी वर्गात नाराजी आहे. मुंबईतील एल्फिन्स्टन आणि परेल रेल्वे स्थानकाला जोडणार्या पुलावर पाच वर्षांपूर्वी मोठी चेंगराचेंगरी झाली.
या घटनेत 22 जणांचा मृत्यू; तर 39 प्रवासी जखमी झाले होते. या घटनेनंतर स्थानक परिसराच्या 150 मीटर परिक्षेत्रात फेरीवाल्यांना बसण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने मज्जाव केला आहे. असे असताना रेल्वे पोलिसांच्या दुर्लक्षामुळे फेरीवाल्यांकडून स्थानक परिसरात पुन्हा अतिक्रमण सुरू झाले आहे. खारघर स्थानकाच्या प्रवेश मार्गावरच मोकळ्या जागांवर कब्जा करून खुलेआम व्यवसाय केला जात आहे. त्यामुळे स्थानकातून बाहेर पडणार्या प्रवाशांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.
कारवाईकडे दुर्लक्ष
खारघर रेल्वे स्थानक परिसरात बेकायदा व्यवसाय करणार्या फेरीवाल्यांबाबत सिडकोच्या सुरक्षा विभागाकडे विचारणा केली असता फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचा अधिकार रेल्वे पोलिसांचा आहे. त्यामुळे तसे लेखी पत्र रेल्वे पोलिसांना दिले असल्याचे सांगण्यात आले, पण याविषयी पनवेल रेल्वे पोलिसांकडे विचारणा केली असता, सिडकोकडून आजपर्यंत एकही पत्र मिळाले नसल्याचा खुलासा करण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही यंत्रणांमधील या टोलवाटोलवीमुळे फेरीवाल्यांवरील कारवाईकडे दुर्लक्ष झाले आहे.
खारघर रेल्वे परिसरात व्यवसाय करणार्या फेरीवाल्यांवर सिडकोकडून कारवाई करण्यात येते. तसेच फेरीवाले बसू नयेत, याविषयी स्थानिक अधिकार्यांना माहिती दिली जाईल. – सचिन कुळवे, मुख्य सुरक्षा अधिकारी, सिडको
खारघर रेल्वे स्थानक परिसरात बेकायदा व्यवसाय करणार्या फेरीवाल्यांवर कारवाई लवकरच केली जाईल. याबाबतची माहिती सिडकोलाही दिली जाईल. – प्रवीण पाढवी, पोलिस निरीक्षक, रेल्वे पोलीस