इंजेक्शन, सुई, सलाईन बाटल्यांनी नागरिक जखमी; प्रशासनाच्या हलगर्जीपणावर संताप
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
वाकण-पाली राज्य महामार्गावरील पाली येथील अंबा नदी पुलाजवळ मोठ्या प्रमाणावर घातक वैद्यकीय कचरा उघड्यावर टाकण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. इंजेक्शन, सलाईन नळ्या, काचेच्या बाटल्या व सुई यांचा ढिगारा आढळून आल्याने परिसरातील शेतकरी व स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे.
हा कचरा अद्यापही तसाच पडून असून, यामुळे अनेक नागरिक व शेतमजूर जखमी झाले आहेत. एप्रिलच्या अखेरीस व जून महिन्यातही या ठिकाणी अशाच प्रकारे वैद्यकीय कचरा फेकण्यात आला होता. मात्र, वारंवार घटना घडूनही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई न केल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
या परिसरातून शेतकरी, प्रवासी, वाहने तसेच गुरेढोरे सातत्याने ये-जा करतात. शेती, गटार, नाले व थेट अंबा नदीत हा कचरा साठत असल्याने जलप्रदूषणासह संसर्गजन्य आजार पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. इंजेक्शनच्या सुया व काचेच्या बाटल्या पायात घुसून गंभीर दुखापती होत असून, लहान मुले व जनावरांसाठी ही स्थिती अधिक धोकादायक ठरत आहे.
स्थानिकांचा रोष
सार्वजनिक ठिकाणी वैद्यकीय कचरा टाकणे म्हणजे थेट नागरिकांच्या आरोग्याशी खेळ आहे, असा आरोप करत ग्रामस्थांनी प्रशासनाच्या हलगर्जीपणावर संताप व्यक्त केला आहे. हा कचरा नेमका कोणत्या दवाखान्यातून आला, याची तातडीने चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
पर्यावरणावर धोक्यात
वैद्यकीय कचऱ्यामुळे जैवविविधतेलाही धोका निर्माण करू शकतो. जनावरे व लहान मुलांच्या संपर्कात हा कचरा आल्यास जीवितहानीची शक्यता नाकारता येत नाही. अंबा नदी दूषित होण्याचीही भीती व्यक्त होत आहे.
सार्वजनिक आरोग्य विभगाचा खुलासा
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शशिकांत मढवी यांनी स्पष्ट केले आहे की, हा कचरा प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा उपकेंद्राचा नाही. आमच्याकडे वैद्यकीय कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली जाते.
आमच्या शेतात जाण्याचा हा एकमेव मार्ग आहे. याआधी माजी आई, आत्या आणि अनेक शेतमजुरांना या सुया टोचून दुखापत झाली आहे. उपचारासाठी दवाखान्यात जावे लागले. वारंवार असे प्रकार घडत असताना नगरपंचायत व वैद्यकीय विभागाने कठोर कारवाई केलीच पाहिजे.
-तुषार ठोंबरे,
शेतकरी, पाली
हा वैद्यकीय कचरा कोणी टाकला याची माहिती घेतली जात आहे. पालीतील सर्व दवाखाने व डॉक्टरांनी वैद्यकीय कचऱ्याचे सुरक्षित व्यवस्थापन करणे बंधनकारक आहे. उघड्यावर वैद्यकीय कचरा टाकणाऱ्यांवर कायद्यानुसार कडक कारवाई केली जाईल.
-सुलतान बेनसेकर,
उपनगराध्यक्ष, पाली







