| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारताच्या नेमबाजांनी जागतिक नेमबाजी स्पर्धेमध्ये आणखी दोन पदकांवर मोहोर उमटवली. माजी ज्युनियर विश्वविजेता हृदय हझारिका व हरयानाची नॅन्सी या भारतीय नेमबाजांनी अनुक्रमे पुरुषांच्या व महिलांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात रौप्यपदकाला गवसणी घातली.
हंगेरीच्या झालन पेकलर व हझारिका यांच्यामध्ये सुवर्णपदकाची लढत पार पडली. झालन याने 252.4 गुणांची कमाई करीत सुवर्णपदक पटकावले. हझारिका याने 251.9 गुणांची कमाई करीत रौप्यपदक जिंकले. नॅन्सीलाही सुवर्णपदक जिंकण्याची सुवर्णसंधी होती. तिच्याकडे 0.1 गुणांची आघाडी होती, पण चीनच्या हॅन जीयू हिने 254 गुणांसह सुवर्णपदक नावावर केले. नॅन्सीला 253.3 गुणांसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.