एचसीसीचा कारभार, परवानगीशिवाय बांधकाम

नियम धाब्यावर, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील सावली आणि टोकेखार परिसरात नियम धाब्यावर बसवून अनधिकृत बांधकाम सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे, हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनी या नामांकित कंपनीने कोणतीही शासकीय परवानगी न घेता शेतजमिनीत थेट दोन मजली इमारतीचे बांधकाम सुरू केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते महेश जानू ठाकूर यांनी केला आहे.

सावली आणि टोकेखार येथील शेतजमिनीवर (गट नं. 123 आणि 32) सध्या आगरदांडा क्रीक ब्रिज प्रोजेक्टचे काम सुरू आहे. या प्रकल्पाच्या नावाखाली एचसीसी कंपनीने प्रशासनाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता अनधिकृतपणे दोन मजली इमारतीचे बांधकाम सुरु केले आहे. ही जागा महसूल अभिलेखानुसार शेती गटात मोडत असून, तिचे अकृषिक जमिनीत रूपांतर करण्यात आलेले नाही.

या बांधकामाबाबत महेश ठाकूर यांनी ग्रुप ग्रामपंचायत सावली यांच्याकडे माहिती अधिकारांतर्गत विचारणा केली असता, ग्रामपंचायतीने लेखी स्वरूपात कळवले आहे की, हा प्रोजेक्ट किंवा कोणत्याही बांधकामासाठी ग्रामपंचायतीने कोणतेही ना हरकत प्रमाणपत्र किंवा परवानगी दिलेली नाही. या बांधकामासाठी संबंधित कंपनीने अद्याप कोणताही अर्जही सादर केलेला नाही. इतकेच नव्हे तर, हे बांधकाम सीआरझेड नियमांचे उल्लंघन करून केले जात असल्याची तक्रार अर्जात करण्यात आली आहे.

स्थानिक नागरिकांचा संताप
सामान्य माणसाला साध्या बांधकामासाठी सर्व परवानग्यांची अट घातली जाते, मग एवढ्या मोठ्या कंपनीला नियम लागू नाहीत का? असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे. या बेकायदेशीर बांधकामामुळे शासनाचा महसूल बुडत असल्याचेही अर्जात नमूद करण्यात आले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव
महेश ठाकूर यांनी 27 फेब्रुवारी 2026 रोजी रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. त्यांनी या अर्जासोबत घटनास्थळाचे फोटो, माहिती अधिकाराचा अहवाल आणि सातबारा उतारे पुरावा म्हणून जोडले आहेत. दोषी कंपनीवर कडक कारवाई करून हे अनधिकृत बांधकाम तातडीने थांबवण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना द्यावेत, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
Exit mobile version