। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
दिल्लीच्या बाहेर सिंधू सीमेवर एका 35 वर्षीय व्यक्तीचा हात तोडून मृतदेह पोलीस बॅरिकेटला बांधलेला आढळल्याने खळबळ उडाली. हत्यार्यांनी या युवकांची हत्या करून त्याचा मृतदेह संयुक्त किसान मोर्चाच्या मुख्य टेंटच्या जवळील बॅरिकेट्सला बांधला. या व्यक्तीच्या शरीरावर ठिकठिकाणी धारदार शस्त्रांचे वार झालेले दिसत आहेत. याची माहिती मिळाल्यानंतर कुंडली पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी घटनास्थळावर येऊन मृतदेह खाली घेतला. तसेच शवविच्छेदनासाठी हा मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आला.
या घटनेविषयी माहिती देताना पोलीस उपअधीक्षक हंसराज म्हणाले, सोनिपतमधील कुंडलीत शेतकरी आंदोलन सुरू आहे तेथे आज (15 ऑक्टोबर) पहाटे 5 वाजता हात बांधून बॅरिकेटला बांधलेला मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळावर पोहचून पाहणी केली. तेव्हा हात-पाय तोडलेला एक मृतदेह बॅरिकेट्सला लटकवलेल्या अवस्थेत सापडला. याला कोण जबाबदार आहे याची कोणतीही माहिती मिळालेली नाही. अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तपास सुरू आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओची चौकशी करण्यात येईल, अशी माहिती हंसराज यांनी दिली.
दरम्यान, 40 शेतकरी संघटना एकत्र येऊन तयार झालेल्या संयुक्त किसान मोर्चाने या हत्येमागे निहंगा असल्याचा आरोप केलाय. संयुक्त किसान मोर्चाचे नेते बलबीर सिंग राजेवाला यांनी इंडिया टुडेशी बोलताना सांगितलं, या हत्येमागे निहंगा आहेत. त्यांनी हे मान्य केलंय. निहंगा सुरुवातीपासून आम्हाला अडचणीत आणत आहेत. संयुक्त किसान मोर्चाने या घटनेशी आपला संबंध नसल्याचं म्हटलंय. तसेच या हत्येतील गुन्हेगारांविरोधात कारवाईसाठी हरियाणा सरकारला सहकार्य करण्यास आपली तयारी दाखवली आहे. या हत्येमागील निश्चित कारण अद्यापही समोर आलेलं नाही. पोलिसांनी देखील याबाबत माहिती नसल्याचं म्हटलं आहे. मात्र, हत्येच्या कारणांबाबत अनेक चर्चा आहेत. त्यापैकी एक चर्चा निहंगा शिख समुहातील काही लोकांनी ही हत्या केल्याची आहे. पीडित व्यक्तीने शिख धर्माचा पवित्र ग्रंथ गुरु ग्रंथ साहिबचा अपमान केल्यानं ही हत्या झाल्याचे बोलले जात आहे.