| नागोठणे | वार्ताहर |
नागोठण्यातील भारतीय एज्युकेशन सोसायटीच्या वेलशेत येथील विद्या संकुलातील शांताबाई ओटरमल जैन आयुर्वेदिक रूग्णालय व शिवसेना शाखा चोळे-गांधे यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीराम मंदिर, गांधेपाडा येथे मोफत रोग निदान व उपचार शिबीर मंगळवार दि. 19 डिसेंबरला संपन्न झाले. भाएसोचे संस्थापक अध्यक्ष किशोर जैन यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या शिबिरात परिसरातील मोठ्या संख्येतील रुग्णांनी आरोग्य तपासणी करुन उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.
या शिबिराचे उद्घाटन दिपक पाटील, अध्यक्ष अनंत भुरे, विश्वास म्हात्रे, विजय पाटील, एकनाथ घासे या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वैद्य आर्चिस पाटील, डॉ. अक्षय ठाकूर, डॉ. रेश्मा मढवी, वर्णिता वाकडे, नुतन ठाकूर, शोभा पाटील, हर्षदा म्हात्रे, शेठ. ओ.एस.परमार अभियांत्रिकी पदविका कॉलेजचे प्राध्यापक वैभव नांदगावकर आदींसह नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. या शिबिरात प्रामुख्याने मणक्यांचे आजार, हृदयरोग, सांधेदुखी, संधीवात, मधुमेह, उच्च रक्तदाब, मेंदूचे विकार, मूळव्याध, श्वसनाचे विकार अशा अनेक-विविध रोगांवरील 105 रुग्णांवर मोफत उपचार करुन त्यांना आयुर्वेदातील अत्यंत महागडी असणारी औषधे मोफत देण्यात आली.







