। कोर्लई । प्रतिनिधी ।
मुरुड तालुक्यातील नांदगाव आयुष हॉस्पिटल व भारतीय तटरक्षक दल यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबाग येथील आरसीएफच्या हॉलमध्ये मोफत आरोग्य शिबिर व सामुदायिक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक आंचल दलाल, आयुष हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ.अनिल गोस्वामी, भारतीय तटरक्षक दलाचे कमांडिंग अधिकारी जयदीप पॉल आदी मान्यवर उपस्थित होते.
सुरुवातीला सर्व उपस्थितांचे स्वागत करण्यात येऊन पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या हस्ते फीत कापून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या शिबिरादरम्यान आरोग्य जनजागृती, निरोगी जीवनशैली, रोगप्रतिबंध, नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व तसेच वैयक्तिक आरोग्य समुपदेशन करण्यात आले. तसेच जनरल मेडिसिन, जनरल सर्जरी, ऑर्थोपेडिक सर्जरी, दंतचिकित्सा तसेच इतर विविध तज्ज्ञ विभागांतील डॉक्टरांनी सहभाग घेत नागरिकांना सर्वसमावेशक आरोग्यसेवा दिली. तज्ज्ञ डॉक्टरांनी नागरिकांची तपासणी करून आवश्यक वैद्यकीय सल्ला दिला. तसेच गरजेनुसार मोफत औषधांचे वितरण करण्यात आले.
या आरोग्य शिबिराला मच्छीमार समाजाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सुमारे 150 मच्छीमार कुटुंबांनी शिबिराचा लाभ घेतला. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत दर्जेदार आरोग्यसेवा पोहोचविणाऱ्या अशा उपक्रमांचे पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी कौतुक केले.
यावेळी भविष्यातही आयुष मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अशा जनहिताच्या आरोग्य शिबिरांचे आयोजन करून ग्रामीण व किनारपट्टी भागातील नागरिकांपर्यंत गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा पोहोचविण्याचा संकल्प कायम ठेवणार असल्याचे व्यवस्थापनाने सांगितले
अलिबागमध्ये मच्छीमार बांधवांसाठी आरोग्य शिबीर
