आरोग्य केंद्र उद्घाटनाच्या प्रतीक्षेत; प्रशासनाचे दुर्लक्ष

पाणीटंचाईमुळे उद्घाटन लांबणीवर पडल्याची चर्चा

| म्हसळा | वार्ताहर |

तत्कालीन पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या आंबेत येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीचे काम जवजवळ पूर्ण झाले असून, केवळ प्रशासनाच्या दिरंगाईमुळे या इमारतीचे उद्घाटन आजही प्रतीक्षेत आहे, असा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, पाणीटंचाईमुळे उद्घाटन लांबणीवर पडले असल्याची उलटसुलट चर्चाही आंबेतवासियांमध्ये रंगत आहे.


दरम्यान, प्रशासनाने त्वरित तोडगा काढून तो प्रश्‍न मार्गी लागले लावून आंबेत पारिसरातील 40 गावांतील सुमारे पंचवीस ते तीस हजार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न लवकरात लवकर मिटवावा, असे आवाहन समाज सेवक नविद अंतुले यांनी केले आहे. पाण्याचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी म्हसळा तालुक्यातील पाणीपुरवठा अधिकारी गांगुर्डे यांच्यासह हा प्रश्‍न कसा मार्गी लावता येईल यासाठी आंबेतमध्ये भेट दिली.

अतिदुर्गम भाग असलेल्या म्हसळा तालुक्यातील आंबेत परिसरात या प्राथमिक आरोग्य केंद्रावर 40 गावांसह पंचवीस ते तीस हजार नागरिकांचे भवितव्य अवलंबून आहे. मात्र, अद्याप ही आरोग्य यंत्रणा ही सक्षम नसून सुमारे पाच कोटी रुपये खर्च करण्यात आलेल्या इमारतीमध्ये पाण्याविना हा शुभारंभ ताटकळत ठेवण्यात आल्याचं बोललं जात आहे. भविष्यात येथील रायगड, रत्नागिरी सीमेवरील नागरिकांना याचा मुबलक फायदा घेता येईल, याकरिता माजी मुख्यमंत्री स्व. बॅ. अंतुले यांनी आंबेतमध्ये आरोग्य केंद्र उभारलं. मात्र कालांतराने याकडे दुर्लक्ष होऊन ही इमारत मोडकळीस आली. यानंतर तब्बल वीस वर्षानंतर नवीन इमारतीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

मागील पाच वर्षे सुरु असलेल्या या सुमारे पाच कोटी रुपयांच्या इमारतीचा काम आज अंतिम टप्प्यात असूनसुद्धा पाण्याविना येथील आरोग्य सुविधा आता ताटकळत उभी आहे. याबाबतीत वारंवार रायगडचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांना याबाबतीत कळवण्यात आल्यानंतर त्यांनी तालुक्यातील अधिकारी वर्गांना बोलावत येथे धाव घेतली. एक महीन्याच आश्‍वासन याठिकाणी अधिकारी वर्गाकडून देण्यात आला आहे. मात्र, प्रत्यक्षात हे प्राथमिक आरोग्य केंद्र कधी सुरु होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. यावेळी माजी कृषी सभापती बबन मनवे, गटविकास अधिकारी पोळ, आरोग्य अधिकारी डॉ. गीतांजली हंभीर, डॉ. गायकवाड, सरपंच आफ्रोजा डावरे, ग्रामसेवक शेंडगे, राजेंद्र सावंत, प्रभाकर चव्हाण यांसह अन्य मंडळी उपस्थित होती.

Exit mobile version