| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
आयएसओ नवघर शाळेत राजमाता जिजाऊ जयंतीचे औचित्य साधून ‘लेक शिकवा अभियान’ अंतर्गत मुलींसाठी विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शाळेतील इयत्ता 6 वी ते 8 वीच्या विद्यार्थिनींना गुड टच-बॅड टच आणि किशोरवयीन आरोग्याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती लहरिया आणि आरोग्य सेविका सुवर्णा दुर्गे यांनी यावेळी मुख्य मार्गदर्शक म्हणून काम पाहिले. डॉ. ज्योती लहरिया यांनी मुलींना गुड टच आणि बॅड टचमधील फरक समजावून सांगितला. स्वतःच्या शरीराचे रक्षण कसे करावे आणि अनुचित प्रकार घडल्यास न घाबरता कोणाकडे मदत मागावी, याचे अत्यंत सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. आरोग्य सेविका सुवर्णा दुर्गे यांनी किशोरवयीन मुलींना या वयात शरीरात होणारे बदल, मासिक पाळी दरम्यान घ्यायची काळजी आणि वैयक्तिक स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले.
शासनाच्या लेक शिकवा अभियान या महत्त्वपूर्ण कार्यक्रमांतर्गत हा उपक्रम राबवण्यात आला. मुलींना केवळ शिक्षणच नव्हे, तर त्यांच्या आरोग्याबाबत आणि सुरक्षिततेबाबत जागरूक करणे हा या मागचा मुख्य उद्देश होता. या शिबिरासाठी शाळेतील इयत्ता 6 वी ते 8 वीच्या सर्व विद्यार्थिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाला शाळेतील सर्व महिला शिक्षिकांची प्रमुख उपस्थिती लाभली, ज्यांनी मुलींच्या शंकांचे निरसन करण्यास मदत केली. या स्तुत्य उपक्रमाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि पालकांनी आरोग्य विभागाचे आभार मानले.







