| पालघर | प्रतिनिधी |
पालघरमधील डहाणू तालुकास्थित असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र गंजाडच्या भरारी पथकातील वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय माणिक सांगळे याला 35 हजार रुपयांची लाच घेताना पालघरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे. डॉ. सांगळे याने वाहनभाडे मंजूर करण्यासाठी तब्बल एक लाखांच्या जवळपासाची लाच मागितली होती. त्यातील 35 हजार रुपयांची लाच घेताना त्याला आज ताब्यात घेतले आहे. सांगळे याच्यावर डहाणू पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गंजाड प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत असलेल्या भरारी पथकामध्ये डॉ. विजय सांगळे हा वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करत असून, वाहनाचे भाडे देयक मंजूर करण्यासाठी त्याने ही लाच मागितली. तक्रारदार याचे दोन मित्र यांची प्रवासी वाहने (इको) आहेत. त्यांनी आरोग्य केंद्र गंजाड अंतर्गत नागझरी, जामशेत, आंबेसरी या उपकेंद्रांवर भाडेतत्त्वावर आपली प्रवासी वाहने दिली होती. या वाहनांच्या भाड्यांचे बिल निघाल्यानंतर बिल काढून दिल्याचा मोबदला म्हणून सांगळे याने दरमहा दहा हजार रुपये प्रत्येक वाहन चालकाकडून घेत होता.
मार्च 2025 ते ऑगस्ट 2025 अशा सहा महिन्यांच्या वाहनांचे भाडे देयक सांगळे याने मंजूर केले आहे. सांगळे याने बिल काढून दिल्याच्या मोबदल्यात प्रत्येकी 30 हजार रुपये लाचेची मागणी वाहन चालकांकडून केली होती. त्यामुळे एका वाहन चालकाने 17 मार्च रोजी पालघरच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाकडे तक्रार केली होती. पोलीस उपअधीक्षक दादाराम करांडे,पोलीस निरीक्षक राकेश डांगे यांनी या घटनेची पडताळणी केली. त्यानुसार सांगळे याने लाच मागितल्याबाबत तथ्य असल्याचे पुढे आल्यानंतर या पथकाने सापळा रचला. डॉ. सांगळे याने केलेल्या 1 लाख 5 हजार रुपये मागणीपैकी 35 हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना अशागड-जामशेत कडे जाणारा रस्त्याच्या एका पान टपरीच्या शेजारी लाचलूचपत विभागाने रंगेहात पकडले असून, त्याला ताब्यात घेतले आहे. डहाणू पोलीस ठाण्यामध्ये डॉ. सांगळे याच्या विरोधात लाचलुचपत विभागाने गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमध्ये पोलीस कर्मचारी नवनाथ भगत, विलास भोये, योगेश धारणे, आकाश लोहारे, प्रकाश दळवी, जितेंद्र गवळे, गीता कहार यांचा समावेश होता.
पालघरमध्ये आरोग्य अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात
