| हमरापूर | वार्ताहर |
वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या बहुविशेषज्ञ सामुदायिक आरोग्य तपासणीचा प्रयोग पेण तालुक्यात होत आहे. यात तालुक्यातील 40 गावांतील ग्रामस्थांचे पुढील 60 दिवसांत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. याची सुरुवात बोरगाव येथे वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. पूर्वा पाटील यांच्या हस्ते करण्यात आली.
यावेळी सरपंच ताई खाकर, उपसरपंच हरेश सुदाम पाटील, ग्रामसेवक गणेश पाटील, माजी सरपंच सुधीर पाटील, सुरेश आणगत, संदीप धाकवल यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. या आरोग्य शिबिरामध्ये नागरिकांना आभा नोंदणी क्रमांक, बहुविशेषज्ञ आरोग्य तपासणी, रक्त तपासणी, इसीजी तपासणी आदी तपासण्या करण्यात आल्या. तसेच गरजू रुग्णांना पुढील उपचारासाठी रेफरल सेवा आणि विविध शासकीय योजना आणि आरोग्य कार्यक्रमांविषयी जनजागृती करण्यात येणार आहे. या उपक्रमाद्वारे गावातील नागरिकांना मोफत आणि सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, त्यासाठी पीएसएम विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ. देवदत्त सूर्यवंशी यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तालुक्यातील झोतीरपाडा, शेडाशी व वरेडी येथेही शिबीर पार पडले आहे. बोरगाव येथे शिबिराच्या उद्घाटनानंतर गावकर्यांना या उपक्रमाचा फायदा घेण्याचे आवाहन केले आणि आरोग्यदायी जीवनशैलीसाठी महत्त्वपूर्ण सूचना डॉ. पूर्वा पाटील यांनी केल्या.