। अलिबाग । वार्ताहर ।
शिवशांती स्नेहालय वृद्धाश्रम व विरंगुळा केंद्र अलिबाग आणि वाघोली येथील उन्नती सांस्कृतिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने वाघोली येथे रविवारी (दि.6) आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 73 जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून रक्तदान शिबिरात 27 जणांनी रक्तदान केले आहे.
शिवशांती स्नेहालय वृद्धाश्रम व विरंगुळा केंद्राच्या या आरोग्य शिबिराचे उद्घाटन अध्यक्ष डॉ. सुभाष म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. सुभाष म्हात्रे व संस्थेच्या सचिव डॉ. प्रतिभा म्हात्रे यांनी रुग्णांची तपासणी करुन त्यांना मोफत औषधोपचार केले. तसेच, डॉ. सुरेश म्हात्रे व डॉ. जगदीश थळे यांनी त्यांना सहकार्य केले. याचवेळी लायन्स हेल्थ फाऊंडेशनतर्फे डोळ्यांची तपासणी करुन ज्यांना मोतीबिंदू आहे, अशा रुग्णांना मोतीबिंदू ऑपरेशनसाठी चोंढी येथे येण्याचे आमंत्रण दिले. डॉ. सूर्यवंशी व डॉ. हुलवान यांनी याकामी सहकार्य केले. या शिबिरात एकूण 73 रुग्णांची तपासणी करण्यात येऊन त्यांना औषधे देण्यात आली. यावेळी उन्नती सांस्कृतिक मंडळातर्फे 27 स्थानिकांनी रक्तदान केले.
यावेळी अॅड. मनोज पडते, प्रफुल्ल राऊत, चारुशिला कोरडे, गजेंद्र दळी, आर.के. घरत, बळवंत वालेकर, शैलेश केवणे, सरपंच अजिता गावंड-गजने, सुरेश वालेकर, पोलीस पाटील, जयवंत वालेकर, प्रगती शिंगरुत, गोपू वालेकर, विकास केवणे, विष्णू शिर्के, अरुण पाडगे आदी उपस्थित होते.