। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
महिलांच्या आरोग्याची तपासणी आणि जनजागृती या उद्दिष्टाने प्रेरित असलेली माता सुरक्षित तर घर सुरक्षित ही मोहीम रायगड जिल्ह्यात राबवली जात आहे. या मोहिमेंतर्गत महिलांचे वजन, रक्तदाब, रक्तातील साखरेचे प्रमाण आणि हिमोग्लोबिन तपासणी केली जाते. आतापर्यंत रायगड जिल्ह्यातील 5 लाख 83 हजार 251 महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे.
राज्यात 18 वर्षावरील महिला, माता, गरोदर स्त्रिया यांच्या आरोग्य तपासणीसाठी 26 सप्टेंबरपासून अभियानाला सुरूवात झाली आहे. जिल्ह्यातील सर्व महिलांची आरोग्य तपासणी होईपर्यंत अभियान सुरू ठेवण्याचा निर्धार रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे, माता बाल संगोपन अधिकारी डॉ. प्रताप शिंदे, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी राजेंद्र भिसे यांनी केला आहे.
राज्यातील 18 वर्षावरील महिलांना, मातांना, गरोदर स्त्रीयांना प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देणे आणि सुरक्षित व सुदृढ आरोग्यासाठी समूपदेशन सुविधा उपलब्ध करून देणे हे उद्दिष्ट आहे. या काळात सकाळी 9 ते दुपारी 2 या दरम्यान वैद्यकीय अधिकारी आणि स्त्रीरोगतज्ञामार्फत तपासणी, औषधोपचार, सोनोग्राफी आणि समुपदेशन करण्यासाठी मेडिकल, डेंटल शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत. विविध आजाराशी संबंधित तज्ज्ञांचेदेखील सहकार्य घेण्यात येत आहे.
आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, सेवक यांच्यामार्फत घरोघरी जाऊन उपलब्ध सुविधेबाबत माहिती देण्यात येत आहे. 30 वर्षावरील सर्व महिलांचे कर्करोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, मोतीबिंदू, कान नाक घसा व इतर आजारांचे निदान व आवश्यकतेनुसार उपचार व समुपदेशन करण्यात येत आहे. अतिजोखमींच्या मातांचे/महिलांचे निदान करून त्यांना आवश्यकतेनुसार उपचार आणि संदर्भ सेवा देण्याचे तसेच जास्तीत जास्त महिलांची आरोग्य तपासणी, शस्त्रक्रिया होतील याचे नियोजन करण्यात आले आहे. या कालावधीत मानवविकास कार्यक्रमाअंतर्गत तज्ज्ञांची शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत, तसेच भरारी पथकामार्फत देखील त्यांच्या कार्यक्षेत्रात येणार्या गावांमध्ये सेवा पुरविण्यात येत आहेत.
आरबीएसके पथकामार्फत शाळा तपासणी नंतर गावात भेट देवून तपासणी आणि समुपदेशन कार्यक्रम घेतले जात आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत महिला व बाल कल्याण विभागाच्या समन्वयाने अंगणवाडी केंद्रात असे कार्यक्रम आयोजित केले आहेत. कुटुंब कल्याण कार्यक्रमाची माहिती सर्व स्तरावर देण्यात येत आहे तसेच नवविवाहीत जोडप्यांना व एक अपत्य असणार्या मातांना दोन अपत्यामध्ये अंतर ठेवण्याबाबत तसेच दोन अपत्यावरील मातांना कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया वरील माहिती देण्यात येणार आहे.
21 हजार महिलांना उच्च रक्तदाब
रायगड जिल्ह्यात 18 वर्षे वयोगटातील 5 लाख 83 हजार 251 महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये उंची आणि वजन मोजलेल्या महिलांची संख्या 5 लाख 10 हजार 337 इतकी आहे.यामध्ये उंची आणि वजन अशी तफावत आढळलेल्या महिलांची संख्या 26 हजार 922 इतकी आहे. 4 लाख 64 हजार महिलांची रक्तदाब तपासणी करण्यात आली. यामध्ये उच्च रक्तदाब आढळलेल्या महिलांची संख्या 21 हजार 71 इतकी आहे.
9 हजार महिलांना रक्तक्षय
2 लाख 30 हजार 253 महिलांचे हिमोग्लोबिन तपासण्यात आले. यामध्ये रक्तक्षय असणार्या महिला 9 हजार 333 आणि तीव्र रक्तक्षय असणार्या 931 महिलांचा समावेश आहे.17 हजार 413 महिलांचे रक्तगट तपासण्यात आले. 1 लाख 87 हजार 379 महिलांची मधुमेहाची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये 9 हजार 583 महिलांना मधुमेह असल्याचे निष्पन्न झाले आहे. 4 हजार 715 महिलांच्या छातीचा एक्सरे काढण्यात आला आहे. 38 हजार 386 महिलांची दांत रोग तपासणी करण्यात आली आहे. 36 हजार 386 महिलांची इतर आजारांसंदर्भात प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली. 15 हजार 728 महिलांच्या गुप्त रोगांची तपासणी तज्ज्ञ वैद्यकीय अधिकार्यांमार्फत करण्यात आली.