। अलिबाग । प्रतिनिधी ।
मागील पाच वर्षापुर्वी देशावर कोरोनाचे संकट आले होते. आता पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. गेल्या 10 दिवसांत कोविड-19च्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाइटवरील आकडेवारीनुसार, सध्या देशात कोविडचे 3 हजार 758 अॅक्टिव्ह प्रकरणे आहेत.त्यामुळे आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. रायगड जिल्हा आरोग्य यंत्रणेने कोरोनाला रोखण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. कोरोना रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निशीकांत पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनीषा विखे यांनी दिली आहे.
देशात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. गेल्या 10 दिवसांत कोविड-19च्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाइटवरील आकडेवारीनुसार, सध्या देशात कोविडचे 3 हजार 758 अॅक्टिव्ह प्रकरणे आहेत. मागील 10 दिवसांत 1200 टक्के पेक्षा जास्त वाढ झाली आहे, जी अत्यंत चिंताजनक आहे. 22 मे रोजी देशात फक्त 257 सक्रिय प्रकरणे होती, जी 26 मेपर्यंत 1 हजार 10 झाली. गेल्या 24 तासांत 363 नवीन प्रकरणे समोर आली असून, त्यात दोन रुग्णांच्या मृत्यूचीही नोंद झाली आहे. जर हीच स्थिती राहिली, तर लवकरच प्रशासनाला पुन्हा कडक निर्बंध लागू करावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशात पुन्हा लॉकडाउन लागणार का? अशीही चर्चा सुरु झाली आहे.
याच पार्श्वभूमीवर रायगडची आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. रायगडात जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय अशी एकूण 15 आरोग्य संस्था आहेत. तसेच, जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या अखत्यारित 55 प्राथमिक आरोग्य केंद्र, 280 उपकेंद्र, 8 जिल्हा परिषद दवाखान्यांचा समावेश आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अखत्यारित येणार्या दवाखान्यांमध्ये बेडबरोबरच ऑक्सीजनची व्यवस्था करण्याची सुचना करण्यात आली आहे. या कालावधीत लागणारे पॅरासीटेल व कोरोना संबंधित असलेली औषधे उपलब्ध आहेत. जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयासह उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयात ऑक्सीजनची व्यवस्था करण्याची सुचना केली आहे. त्यानुसार संबंधित रुग्णालयातील डॉक्टरांसोबत बैठक घेऊन सांगण्यात आले आहे. मागील चार दिवसांपुर्वी अतिदक्षता विभागातील दोन रुग्णांची कोविड चाचणी करण्यात आली होती. मात्र, दोघेही निगेटीव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात सध्या कोरोना बाधीत रुग्ण नसल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निशीकांत पाटील यांनी दिली.
नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन
जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रासह उपकेंद्र जिल्हा परिषद दवाखाने आहेत. ग्रामीण भागात वैद्यकिय अधिकारी उपलब्ध आहेत. कोव्हीड संबंधित औषधे आहेत. अधिक औषधे लागल्यास तातडीने खरेदी करून घेण्याचे काम सुरु केले आहे. जिल्ह्यात कोरोनाबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न जिल्हापरिषद आरोग्य विभागाचा राहणार आहे. मास्क लावणे, गर्दीत जाऊ नये, अशा प्रकारे जागृत ठेवण्याचे काम सुरु केले आहे, नागरिकांनी काळजी घ्यावी असे सांगण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिषा विखे यांनी दिली.
