जिल्हा सार्वजनिक आरोग्य विभाग आणि स्वदेस फाऊंडेशनचा प्रयत्न
| अलिबाग | प्रतिनिधी |
अपुऱ्या आरोग्य सेवेमुळे रुग्णांना चांगली सेवा मिळण्याचा प्रश्न सतत भेडसावत असतो. आता मात्र आरोग्याची सुधारणा सामंजस्य करारातून केली जाणार आहे. रायगड जिल्हा सार्वजनिक आरोग्य विभाग आणि स्वदेस फाऊंडेशन यांच्यामध्ये हा करार सोमवारी झाला. जिल्ह्यामधील सात तालुक्यांमध्ये हा उपक्रम राबविला जाणार आहे.
वाढत्या औद्योगिकीकरणामुळे नागरीकरणही झपाट्याने वाढत आहे. रुग्णांना सेवा देताना आरोग्य विभागाची कायमच दमछाक होत असते. रायगड जिल्ह्यातील आरोग्यसेवांच्या उपलब्धतेमध्ये सुधारणा करण्यासाठी आणि आरोग्य सेवांची गुणवत्ता वाढवण्यासाठी महत्त्वाचा टप्पा म्हणून स्वदेस फाऊंडेशन आणि रायगड जिल्हा सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्यात सोमवारी (दि. 7) जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी किशन जावळे व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला आहे.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निशिकांत पाटील व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यावतीने डॉ. नितीन बावडेकर, स्वदेस फाऊंडेशन यांच्यावतीने मंगेश वांगे, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि डॉ. सुरेंद्र यादव, उपसंचालक आरोग्य-स्वदेस फाऊंडेशन यांनी सामंजस्य करारनाम्यावर स्वाक्षरी केली. महाराष्ट्र राज्य सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव डॉ. निपुण विनायक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सूचनेनुसार हा सामंजस्य करार करण्यात आला आहे.
शासनाच्या आरोग्यसेवा मजबूत करणे आणि ग्रामीण समुदायांसाठी दर्जेदार आरोग्यसेवा पुरवण्यात मदत करणे, हा या कराराचा उद्देश आहे. या सहकार्याद्वारे स्वदेस फाऊंडेशन आणि रायगड जिल्हा सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्यामार्फत सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला अधिक बळकट करण्यासाठी मदत करणार आहे. ही भागीदारी समुदायावर आधारित शासकीय आरोग्य कार्यक्रमांबाबत जनजागृती वाढविण्याबरोबरच अत्यावश्यक आरोग्य सेवा शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न राहणार आहे. रॉनी स्क्रूवाला आणि झरीना स्क्रूवाला यांची स्वदेस फाऊंडेशन रायगड जिल्हामधील महाड, पोलादपूर, माणगाव, तळा, श्रीवर्धन, म्हसळा व सुधागड या तालुक्यांमध्ये ग्रामीण सक्षमीकरणासाठी समग्र 360-अंश दृष्टिकोनातून कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्था या तालुक्यामध्ये सामंजस्य करारामुळे फायदा होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.





