रेवदंडा परिसरात कचऱ्याचे ढीग

दुरुस्तीसाठी पैसे नसल्याने घंटागाडी बंद; दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य थोक्यात

| रेवदंडा | विशेष प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यातील कोट्यवधींची उलाढाल असलेल्या रेवदंडा ग्रामपंचायतीकडे घंटागाडी दुरुस्तीसाठी पैसे नाहीत, याबाबतचे भीषण वास्तव समोर आले आहे. परिणामी, गावात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असून, बाजारपेठा-मार्ग कुठेही जा, तिथे दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून, आजारांचा धोका वाढला आहे.

रेवदंडा ग्रामपंचायत महसुलात देशभरात प्रसिद्ध, पण आरोग्य सेवेत मात्र रद्दीचा आलेख! स्वच्छता अभियानाचा आवाज केवळ बोर्डावर किंवा सरकारी जाहिरातींमध्ये ऐकू येतो. सरकारचे ‌‘ग्रामस्वच्छता अभियान’ प्रत्यक्षात रेवदंड्यात गुदमरूनच गेलंय, अशी बिकट परिस्थिती सर्वत्र आहे. घंटागाडी बंद; पण घरपट्टी आणि आरोग्य करासाठी कपाट उघडं… पैसा येतो कुठे, खर्च कशावर? गावकरी विचारतात, प्रशासन मौन बाळगत असल्याने संताप व्यक्त होत आहे. वर्षानुवर्षे ऑडिट झालं नाही, खर्चाचे स्पष्टीकरण अद्याप नाही. ग्रामस्थांकडून कर वसूल करायचा, पण सेवा मात्र गुप्त गैरव्यवहाराच्या ढिगाऱ्यात लपवायची, हेच नवे व्यवस्थापन असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.

सामाजिक संस्था स्वखर्चाने वर्षातून चार-पाच वेळा रस्ते घासून काढतात, पण लोकप्रतिनिधी आणि अधिकारी मात्र फोटो-ओढून वाहवा लाटतात. रेवदंडा हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे श्रद्धास्थान, मग या श्रद्धास्थानात असा दुर्गंधीचा विटाळ कसा सहन केला जातो? ग्रामविकास अधिकारी सुदेश राऊत म्हणतात, “निधी मिळाला की घंटागाडीचा मार्ग निघेल.” निधी कुठे जातो, घंटागाडीला तेल किंवा रिपेअरची व्यवस्था ग्रामपंचायतीकडे का नाही, ग्रामस्थांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, राज्यपाल देवव्रत आचार्य, मुख्य सचिव राजेंद्र कुमार यांच्यापर्यंत सवाल पाठवला आहे.

Exit mobile version