कचरा ‘बालदी’त भरणार कोण?; प्रवाशांचा सवाल
। अलिबाग । प्रतिनिधी ।
एका बाजूला विद्यमान सरकार स्वच्छ भारत अभियानासाठी करोडो रुपये खर्च करीत आहे. तर, दुसर्या बाजूला सत्तेतील आमदारांकडूनच कचर्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. डंपिंग ग्राऊंडचा प्रश्न सोडविण्यास आमदार अपयशी ठरले आहेत. यामुळे उरण-भेंडखळ मार्गावर रस्त्यावरच कचर्याचे ढीग साचले आहे. हा कचरा बालदीत कोण भरणार, असा सवाल प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.
उरण हा मुंबई, ठाणेच्या अगदी जवळ असलेला रायगड जिल्ह्यातील तालुका म्हणून ओळखला जातो. उरण परिसरात वेगवेगळे प्रकल्प निर्माण होत असताना, नव्यानेदेखील काही प्रकल्प येऊ घातले आहेत. वाढत्या प्रकल्पांमुळे उरणची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. औद्योगिक तालुका म्हणून उरण नावारुपाला आला आहे. वेगवेगळे लहान-मोठे उद्योग उरणमध्ये आहेत. उरणमध्ये नववीन रस्त्यांची कामे झाली आहेत. त्यामध्ये उरण-भेंडखळ या रस्त्याचे कामही करण्यात आले आहे. खोपटा, कोप्रोली मार्ग असलेला हा रस्ता चकाचक आहे. त्यामुळे या रस्त्यावरून वाहनांची वर्दळ प्रचंड वाढली आहे. दुचाकी वाहनांसह मोठी वाहने तसेच पादचारीदेखील या मार्गावरून ये-जा करीत आहेत. मात्र, या मार्गावरील द्रोणागिरीजवळच रस्त्यावर कचर्याचा ढिगारा पडलेला आहे. ओला व सुका कचरा रस्त्याच्या दुतर्फा असल्याने नाक दाबून नागरिकांना प्रवास करावा लागत आहे. बाजूलाच नागरी वसाहतदेखील आहे. प्लास्टिकसह अन्य कचरा वार्यामुळे रस्त्यावर आला आहे. विद्यमान आमदार कचराभूमीचा प्रश्न सोडविण्यास उदासीन ठरत आहेत. कचर्याची विल्हेवाट लावण्यासाठी जागा नसल्याने या मार्गावर दुतर्फा कचरा टाकला जात असल्याची माहिती समोर आली आहे. कचर्यामुळे येथील मानवी आरोग्य धोक्यात आले आहे. वेगवेगळे आजार कचर्यामुळे निर्माण होण्याची भीती असतानाच प्लास्टिकमुळे पूरपरिस्थितीचा प्रश्न उद्भवण्याची चिंता व्यक्त केली जात आहे. उरणच्या विकासासाठी कटिबद्ध अशा बतावण्या विद्यमान आमदार कायमच त्यांच्या भाषणातून करीत आले आहेत. मात्र, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न सोडविण्यास उदासीन का, असा सवाल जनमानसातून उपस्थित केला जात आहे. सुविधांचा अभाव असल्याने हे प्रश्न निर्माण झाल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.
नागरिकांच्या आरोग्याशी खेळ
उरणमधील नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी शासन वेगवेगळ्या योजना राबवित आहे. मात्र, उरणमधील सत्तेत असलेले आमदारच नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचा प्रकार समोर आला आहे. उरण-भेंडखळ सुसज्ज असा रस्ता कचराभूमी झाला आहे. प्लास्टिकसह ओला-सुका कचर्याने हा रस्ता भरला आहे. या रस्त्यावर वाहनांची वर्दळ कायमच असते. त्यामुळे येणार्या-जाणार्या पादचार्यांसह प्रवासी, चालकांना दुर्गंधीमुळे नाक दाबून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे अपघात होण्याचा धोका नाकारता येत नाही.
करोडो रुपये खर्च करून केलेला रस्ता कचराभूमी
उरणमधून मुंबईला अवघ्या काही तासातच पोहोचता यावे, यासाठी उरणमध्ये दळणवळणाची साधने उपलब्ध करण्यात आली आहेत. वेगवेगळी रस्त्यांची कामे करण्यात आली आहेत. तर, काही ठिकाणी ही कामे प्रलंबित आहेत. उरण ते भेंडखळ हा दुपरी रस्ता करोडो रुपये खर्च करून शासनाने केला आहे. रस्त्याच्या मध्यभागी सुशोभीकरणासाठी झाडांची लागवडदेखील केली आहे. परंतु, याच रस्त्याच्या दुतर्फा कचर्याचा ढिगारा आहे. रस्त्याच्या मध्यभागीदेखील ठिकठिकाणी कचरा अस्ताव्यस्त पडलेला आहे. करोडो रुपये खर्च करून केलेला हा रस्ता कचराभूमी म्हणून ओळखळा जात असल्याची चर्चा आहे.
उरणच्या सौंदर्यावर डाग
उरण तालुका एक ऐतिहासिक स्थळ म्हणून ओळखले जाते. पर्यटनाबरोबरच औद्योगिक क्षेत्र म्हणून तालुक्याला ओळखले जात आहे. फिरण्याबरोबरच नोकरी व्यवसायासाठी येणार्यांची संख्यादेखील उरणमध्ये वाढू लागली आहे. मुंबईच्या अगदी जवळ असलेल्या या तालुक्याच्या सौंदर्यावर कचर्यामुळे डाग पडला आहे. पर्यटकांसह स्थानिकांकडूनदेखील या कचर्यामुळे नाराजीचे सूर उमटत आहेत.
उरणच्या आमदारांचे दुर्लक्ष
अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेले विद्यमान आमदार महेश बालदी आता भाजपचे उरणमधील नेते आहेत. त्यांच्याकडून जनतेच्या प्रचंड अपेक्षा आहेत. उरणचा विकास होण्याबरोबरच येथील सौंदर्य कायम राखणे, स्वच्छता, आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी उपाययोजना करणे, अशा अनेक मागण्या नागरिकांच्या कायमच राहिल्या आहेत. मात्र, उरण ते भेंडखळ या रस्त्यांवरील कचर्याच्या ढिगार्याकडे उरणच्या आमदारांचे अक्षम्य दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. नागरिकांच्या आरोग्याशी त्यांना काहीही देणे घेणे नसल्याचे दिसून येत आहे. स्वच्छतेसाठी सरकारकडून करोडो रुपये खर्च करूनदेखील उरणमधील आमदार याबाबत का डोळेझाक करतात, असा सवाल जनमानसातून उपस्थित केला जात आहे.