| पुणे | वृत्तसंस्था |
विवाहबाह्य संबंधातून गर्भवती राहिलेल्या प्रियसीचं गर्भपात करताना मृत्यू झाला. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावताना प्रियसीच्या दोन्ही मुलांना इंद्रायणीच्या नदी पात्रात जिवंत फेकून देण्यात आल्याची धक्कादायक घटना पुण्याच्या मावळ तालुक्यात घडली आहे. ही संतापजनक घटना 9 जुलै रोजी घडली असून या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी प्रियकर आणि त्याच्या मित्राला बेड्या ठोकल्या आहेत.
सविस्तर माहिती अशी की, गर्भवती प्रियसीचा गर्भपात करण्यासाठी 6 जुलै रोजी रुग्णालयात आणण्यात आले होते. 6 जुलै रोजी गर्भवती प्रेयसीला आणि तिच्या 5 आणि 2 वर्षीय मुलाला घेऊन प्रियकर गजेंद्र दगडखैर कळंबोली येथे गेला. तेथील अमर रुग्णालयात प्रेयसीचे गर्भपात करण्यात आले, मात्र डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे प्रियसीचा 8 जुलैला मृत्यू झाला. त्यानंतर गर्भपात करून देणाऱ्या एजंट महिलेने मध्यस्थी करत मृतदेह गजेंद्रचा मित्र रविकांत गायकवाडच्या सोबतीने मावळमध्ये आणला आणि गजेंद्र आणि रविकांतने 9 जुलैच्या अंधारात इंद्रायणी नदीच्या वाहत्या प्रवाहात मृतदेह फेकून दिला. नंतर प्रेयसीची दोन्ही मुले रडू लागली. आता या दोघांमुळे आपलं बिंग फुटेल, या भीतीने निर्दयीपणाचा कळस गाठला. कोणतीही दया-मया न दाखवता त्या दोन्ही मुलांना ही त्याच नदीच्या प्रवाहात जीवंत फेकून दिले.