| पनवेल | वार्ताहर |
तळोजा देवीचापाडा येथील 3 वर्षीय मुलीची हत्या करून तिचा मृतदेह राहत्या घरात सुटकेसमध्ये ठेवल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी (दि.27) समोर आला आहे. हार्षिक अमलेश शर्मा (3) असे मृत मुलीचे नाव असून, ती मंगळवारपासून बेपत्ता होती. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. तळोजा पोलिसासह गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक पुढील तपास करीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलगी तिच्या आई वडिलांसह देवीचा पाडा येथे राहत होती. ती मंगळवारी (दि.25) खेळण्यासाठी बाहेर गेली होती. त्यानंतर ती बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या आईवडिलांनी तळोजा पोलिस ठाण्यात दिली होती. दरम्यान, गुरुवारी तिचा मृतदेह राहत्या घरातील बाथरूमवरील पोटमाळ्यावर असलेल्या सुटकेसमध्ये ठेवल्याचे आढळून आले. पोट माळ्यावरून वास येऊ लागल्याने पाहणी केली असता मृतदेह सुटकेसमध्ये आढळून आला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून घटनेची माहिती घेत आरोपीचा शोध सुरू केला आहे. हरवलेल्या मुलीचा मृतदेह घरातच आढळल्याने आई-वडिलांना धक्का बसला आहे. या घटनेचा अधिक तपास तळोजा पोलीस करीत आहेत.