| हिंगोली | वृत्तसंस्था |
हिंगोली जिल्ह्याच्या सेनगाव तालुक्यात रक्ताच्या नात्याला कलंक लावणारी घटना घडली आहे. येथील एका तरुणाने आपल्या सख्खा भावाची हत्या केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी भावासह त्याच्या मित्राला अटक केली आहे.
हरिभाऊ किसन खोडके असे आरोपी भावाचे नाव आहे. तर शिवाजी किसन खोडके असे हत्या झालेल्या लहान भावाचे नाव आहे. दोघंही हिंगोली जिल्ह्याच्या सेनगाव तालुक्यातील शेगाव खोडके इथं राहत होते. आरोपी हरिभाऊ खोडके याने आपल्या वडिलोपार्जित संपत्तीमध्ये वाटेकरू राहू नये, म्हणून आपल्या लहान भावाला संपवले आहे. घटनेच्या दिवशी आरोपीने कामानिमित्त लहान भाऊ शिवाजी याला शेतात बोलावून घेतलं होतं. भाऊ शेतात आल्यानंतर आरोपीने मित्र पवन आखाडे याच्या मदतीने भावाची गळा दाबून हत्या केली.
यानंतर दोन्ही आरोपींनी शिवारातच खड्डा खोदून शिवाजी खोडके याचा मृतदेह पुरला. हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही, तर हत्येचा संशय आपल्यावर येऊ नये म्हणून आरोपी भावाने गोरेगाव पोलीस ठाण्यात जाऊन लहान भाऊ हरवल्याची तक्रार दिली. पण 23 वर्षांचा मुलगा अशाप्रकारे अचानक गायब झाल्याने नातेवाईकांना संशय आला. त्यांनी शिवाजी याचा विविध ठिकाणी शोध घेतला. यावेळी नातेवाईकांना शिवाजीचा मृतदेह शिवारातील एका खड्ड्यात पुरल्याचे आढळून आले. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी आरोपी भाऊ हरिभाऊ खोडके आणि त्याचा मित्र पवन आखाडे याच्याविरोधात हत्येसह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे. वडिलोपार्जित संपत्तीत भागीदार राहू नये म्हणून आरोपीने ही हत्या केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. या घटनेचा अधिक तपास गोरेगाव पोलीस करत आहेत.