सायन–पनवेल महामार्गावर उष्णतेचा कहर 

उष्माघातामुळे तरुण कोसळला

| पनवेल ग्रामीण | प्रतिनिधी |

राज्यात उष्णतेचा कहर वाढत असतानाच सायन – पनवेल महामार्गावर एक धक्कादायक प्रसंग घडला आहे. खारघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर दुचाकीवरून प्रवास करणारा एक तरुण अचानक उष्माघातामुळे बेशुद्ध होऊन फुटपाथवर कोसळला. काही क्षणांतच घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, दुपारच्या कडक उन्हात प्रवास करत असताना त्या तरुणाला अचानक अस्वस्थ वाटू लागले. प्रसंगावधान राखत त्याने दुचाकी रस्त्याच्या कडेला उभी केली; मात्र पुढच्याच क्षणी त्याला चक्कर येऊन तो कोसळला. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली आणि जवळच तैनात असलेल्या वाहतूक पोलिसांना पाचारण केले. सागर ठाकूर, सुधीर राठोड, अश्विनी राठोड आणि रामेश्वर खताळ या पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता तातडीने त्या तरुणाला उचलून जवळील एमजीएम रुग्णालयात दाखल केले. वेळेत मिळालेल्या मदतीमुळे मोठा अनर्थ टळला असून, उपचारानंतर त्या तरुणाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. दरम्यान, नवी मुंबई व पनवेल परिसरात तापमानाचा पारा 40अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याने उष्णतेचा प्रचंड तडाखा बसत आहे. या पार्श्वभूमीवर पनवेल महानगरपालिकेकडून नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महापौर नितीन पाटील यांनी दुपारच्या वेळेत अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी पिणे, डोक्याचे संरक्षण करणे आणि उन्हापासून बचावाच्या उपाययोजना कराव्यात, असे आवाहन केले आहे. दरम्यान, या प्रसंगात दाखवलेल्या सतर्कता आणि तत्परतेबद्दल नवी मुंबई पोलीस उपआयुक्तांनी संबंधित वाहतूक पोलिसांचे विशेष कौतुक केले आहे.

Exit mobile version