गणेशोत्सवात मुसळधार पावसाचे विघ्न

बोर्ली नाक्यावर वाहतुकीची कोंडी

| मुरूड-जंजिरा | वार्ताहर |

सार्वजनिक उत्सवाची कमतरता न भासणारा मुरूड तालुक्यातील घरगुती गणेशोत्सव प्रसिद्ध आणि पाहण्याजोगा आहे; परंतु ऐन गौरी-गणपतीच्या उत्सवात मुसळधार पावसाने मोठे विघ्न निर्माण केल्याने बाहेर पडणे अवघड बनले आहे. बुधवारी रात्रीपासून विजेच्या गडगडाटासह परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे.

गुरुवारी सकाळपासून पावसाचा जोर अधिक वाढल्याने अनेक जण भयभीत झाले आहेत. गौरी मातेच्या आगमनाआधी मोठ्या संख्येने माहेरवाशिणी पूजनासाठी आल्या आहेत. खरेदीसाठी बाजारपेठेत प्रचंड वर्दळ दिसून येत होती. दरम्यान, गडगडाटासह पाऊस कोसळत असल्याने कशीबशी खरेदी आटोपून महिला घरचा रस्ता पकडताना दिसत होत्या. पावसामुळे सर्वच परिस्थिती अवघड बनली आहे. आकाशात काळोख दाटून पडणारा पाऊस पाहून धडकी भरत आहे. हवामान खात्याने 2 ते 3 दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला असल्याने घरोघरी मित्र परिवार, नातेवाईक आदींकडे गौरी-गणपती दर्शनाला जायचे कसे, अस प्रश्न गणेशभक्तांना पडला आहे. मुरूड तालुक्यात सुमारे सात हजार घरगुती गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली असून, कुठेही सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन केले जात नाही. तालुक्यात आतापर्यंत 2282 मिमी पाऊस पडल्याची माहिती मुरूड तहसील सूत्रांनी दिली.

गौरी-गणेशोत्सव सुरू असल्याने अनेकजण मिळेल त्या वाहनाने किंवा स्वतःच्या वाहनाने मुरूड, नांदगाव, मजगाव, बारशिव, काशीद आणि पुढील गावांकडे मोठ्या संख्येने येत आहेत. येथे येणाऱ्या मुरूड ते अलिबाग या मुख्य राज्य मार्गावर बोर्ली गाव लागते. या बोर्ली नाक्यावर रस्त्याचे काँक्रिटीकरण आयत्या वेळी गणेशोत्सवात काढल्याने एकेरी वाहतूक सुरू आहे. त्यामुळे वर्दळीच्या बोर्ली नाका येथे सातत्याने वाहनांची वाहतूक कोंडी होत आहे. वाहनांना जायला दुसरा बायपास मार्ग किंवा जागादेखील नसल्याने वाहनचालकांची प्रकरणे हमरीतुमरीवर येत आहेत. एकच वाहन कसेबसे पास होत असून, कसरत करावी लागत आहे. पावसाने हा मार्ग आधिक धोकादायक बनला आहे. दुसऱ्या बाजूकडील काँक्रिट मार्ग अद्याप वेळीच पूर्ण न झाल्याने गणेशोत्सवात मोठी अनुचित घटनेची शक्यता नाकारता येत नाही. सार्वजनिक बांधकाम खात्याकडून गणेशोत्सवाच्या आधीच हे काँक्रिटीकरण पूर्ण होणे महत्त्वाचे होते, अशा संतप्त प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या आहेत.

Exit mobile version