सावित्री, अंबा आणि कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडली
। रायगड । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात होणाऱ्या मुसळधार पर्जन्यवृष्टीने रायगडकरांची झोप उडवली आहे. गेल्या 24 तासात सुरू असलेल्या पावसाने महाडच्या सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. यामुळे नगरपरिषदेने भोंगा वाजवून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. महाड शहरात सखल भागात दस्तुरी नाका, सुकट गल्ली परिसरात सावित्री नदीचे पाणी शिरले आहे. सद्यस्थितीत महिकावती मंदिराजवळ नदी पाणी पातळी 6.70 मीटर पेक्षा जास्त असल्याची नोंद झाली आहे. तसेच, सुधागड तालुक्यात पाऊस जोरात सुरू असुन पाली ते वाकण रस्त्यावरील अंबा नदीवरील पुलावरून पाणी जात आहे. खबरदारी म्हणून पुलावरील वाहतूक पोलीस बंदोबस्त ठेवून बंद करण्यात आलेली आहे. याचबरोबर कुंडलिका नदीने सुद्धा धोक्याची पातळी ओलांडली असून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, मुसळधार पर्जन्यवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेचा उपाय म्हणून रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी महाड, पोलादपूर, माणगाव, तळा, रोहा आणि सुधागड तालुक्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.