पावसामुळे आंबेवाडी बाजारपेठत पाणीच पाणी
| कोलाड | वार्ताहर |
परिसरात बुधवारी (दि.12) जुन रोजी दुपारी 3.00 वाजण्याच्या सुमरास पावसाची तुफान फटकेबाजी पहावयास मिळाली, यामुळे आंबेवाडी बाजारपेठेत क्षणातच पाणीच पाणी होऊन पुरस्थिती निर्माण झाली असुन या पाण्यातून मार्ग काढतांना वाहनचालकांना वाहन चालवतांना तारेवरची कसरत करावी लागली.
मुंबई-गोवा हायवेवरील आंबेवाडी बाजारपेठेतील निकृष्ट दर्जाच्या रस्त्यामुळे सोमवारी (दि.11) येथील नागरिकांनी रास्ता रोको केला, तर दुसर्याच दिवशी तुफान पावसामुळे पुरस्थिती निर्माण झाली. याचा नाहक त्रास वाहनचालकांसह प्रवाशी वर्ग तसेच येथील नागरिक यांना सहन करावा लागत आहे. ”रोज मरे त्याला कोण रडे? अशीच या मार्गाची परिस्थिती झाली आहे. आंबेवाडी बाजारपेठेतील रस्त्याचे काम हे धोकादायक आहेच, परंतु याबरोबर या बाजारपेठेतील रस्ता खाली तर गटारवर असल्यामुळे थोडा जरी पाऊस पडला तरी या संपूर्ण बाजारपेठेत पाणीच पाणी होऊन पुरस्थिती निर्माण होते. तर सतत दोन दिवस पाऊस पडला तर काय परिस्थिती निर्माण होईल? याला कारण ठेकेदाराची चाललेली मनमानी व यावर प्रशासनाचे नसलेले वचक यामुळे येथे दररोज छोटे मोठे अपघात होत आहेत यामुळे मोठा अपघात होऊन एखाद्या प्रवाश्याचा नाहक बळी गेला तर याला जबाबदार कोण? यामुळे येथील असंख्य नागरिक एकत्र येऊन रस्त्यावर उतरून लवकरच लवकर तीव्र आंदोलन करणार असल्याचे बोलले जात आहे.