कोकणात मुसळधार

रेल्वेसेवा विस्कळीत, महामार्ग बंद

| रत्नागिरी | प्रतिनिधी |

राज्यातील अनेक शहरांना पावसाचा फटका बसला. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, आणि सिंधुदुर्गात अतिमुसळधार पावसाने हजेरी लावली होती. मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं. रविवारी संध्याकाळी किल्ले रायगडावर ढगफुटीप्रमाणे पाऊस झाला. यामुळे किल्ले रायगडाच्या पायरी मार्गाला ओढ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. पर्यटक अडचणीत येत, त्यांच्या सुरक्षिततेसाठी त्वरित उपाययोजना करण्यात आली. मुंबईत रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे लोकल सेवा बंद करण्यात आली. केवळ ठाणे ते कल्याण या ठिकाणी सेवा सुरू ठेवण्यात आल्या होत्या.

कर्जत, कसार्‍याकडून मुंबईकडे जाणारी रेल्वेसेवा फक्त ठाण्यापर्यंतच सुरू होती. कर्जत बदलापूरहून मुंबईकडे जाणार्‍या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. रत्नागिरी जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पाऊस थांबल्यामुळे पूरपरिस्थिती नियंत्रणात आली आहे. जिल्ह्यातील सर्वच नद्या अद्यापही इशारा पातळीवर आहेत. हवामान विभागाने आज जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट दिला असून सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. मुंबईत पहाटेपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. संपूर्ण मुंबईत पाणी साचल्यामुळे रस्ते वाहतूक मंदावली होती. भांडुप रेल्वे स्थानक पाण्याखाली गेलं असून, सीएसएमटीवरून ठाण्याकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. लांब पल्ल्याच्या गाड्या ठाणे आणि दिवा स्थानकातच थांबवण्यात आल्या.

Exit mobile version