| म्हसळा | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यात सर्वात जास्त पाऊस पडण्याची नोंद म्हसळा तालुक्यात होत असते. दोन दिवसांत 358 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यात आतापर्यंत एकूण 4095 मि.मी. पाऊस पडला आहे. मागील चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्याने तालुक्यात नदी नाल्यांच्या पाण्याची पातळी वाढली आहे.
पांगलोळी गावातील सखल भागात पावसाचे व नदी खाडीचे पाणी साचले असल्याने जाण्या येण्याचा मार्ग बंद झाला होता. पांगलोळी गावातील रहिवासी मोहसीन अ.अझीझ धनसे यांच्या घराची पडवी कोसळून वित्त हानी झाली आहे, तर लेप गावी एका घरासमोरील संरक्षण भिंत कोसळली आहे. मरियम खार येथील सचिन दौलत पारावे यांच्या घराची मागील भिंत कोसळली आहे. म्हसळा शहरात इम्तियात दळवी यांच्या घरावर विजेचा पोल पडून घरातील वीज फिटिंगसह संपूर्ण इलेक्ट्रिक साहित्य जळून गेल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. म्हसळा बायपास येथील ईदगा मैदानाची संरक्षण भिंतचे दोन ठिकाणी बांधकाम कोसळले आहे.
ढोरजे गाव मार्ग पुलावरून पाणी वाहत असल्याने येथील काही गावांचा येण्या जाण्याचा मार्ग बंद झाला होता. या मार्गावरून कोणी जाऊ नये अशी दवंडी पोलीस पाटील यांनी सोशल मीडियावर दिली होती. म्हसळा शहरातील दिघी रोड परिसर, तहसील कार्यालय येथे गुडघाभर पाणी साचल्याने लोकांना रहदारी करण्यासाठी मोठी कसरत करावी लागली.दि.18 ऑगस्ट रोजी सकाळी श्रीवर्धन आगारातून बोर्लीमार्गे मुंबई, बोरिवली, नालासोपारा, पुणे येथे जाणाऱ्या एस.टी.गाड्या खुजारे येथील राज्य मार्गावर पाणी साचल्याने प्रवासी वाहतूक ठप्प पडली होती.







