पनवेलमध्ये सरीवर सरी

शाळकरी मुलं आणि चाकरमान्यांचे हाल

| पनवेल | वार्ताहर |

पनवेल परिसरात मंगळवारी सकाळी आलेल्या अवकाळी पावसामुळे रहिवाशांची त्रेधातिरपीट उडाली. शाळकरी मुलं आणि चाकरमान्यांचे हाल झाले. सिडको वसाहतीत कित्येक ठिकाणी पाणी साचल्याने अंतर्गत वाहतूक मंदावली.


हवामान खात्याने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. तो पनवेल परिसरात तंतोतंत मंगळवारी खरा ठरला. सकाळी 7 वाजता पावसाने जोरदार हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे पहिल्या सत्रात शाळेत जाणारे शाळकरी मुलं मुली त्याचबरोबर चाकरमानी भिजले. ढग दाटून आल्याने एक प्रकारे दिवसा अक्षरशा काळोख दाटला. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागले. काही मिनिटातच कळंबोली सह सिडको वसाहती मध्ये पाणीच पाणी झाले. सखल भागात पाणी साचल्याने बर्‍याच ठिकाणी वाहतूक सुद्धा मंदावली, मुख्य नाके आणि चौकामध्ये वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले. अनेकांना शाळा आणि कार्यालय वेळेत गाठता आले नाहीत. छत्र्या आणि रेनकोट न आणल्याने काहींना भिजावे लागले. तर अनेक ठिकाणी विद्युतपुरवठा सुद्धा खंडित करण्यात आला होता . अचानक आलेल्या पावसामुळे रोगराई वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Exit mobile version