रायगडमध्ये पावसाचे थैमान

जनजीवन विस्कळीत, अनेक घरांत पाणी; गावे, वाड्या पाण्याने भरल्या,लाखोची वित्तहानी

। अलिबाग । प्रमोद जाधव ।

गेल्या अनेक दिवसांपासून शेतकर्‍यांसह जिल्ह्यातील नागरिक पावसाच्या प्रतिक्षेत होते. अखेर रविवारी पावसाने हजेरी लावली. सायंकाळपासून सुरू झालेल्या पावसाने रात्रभर थैमान घातला. नद्या, शेत पाण्याने तूडूंब भरून गेले. अलिबागसह पनवेलमधील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने घरातील विद्यूत साहित्य,धान्य व कपडे भिजून प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे लाखोची वित्तहानी झाल्याची माहिती समोर येत आहे. रायगड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 83.2 टक्के पाऊस पडला आहे. सरासरी 259.1 मी. पावसाची नोंद झाली आहे. सर्वात जास्त म्हसळा, मुरूड, अलिबाग, महाड, खालापूर, पोलादपूर, पेण, माणगाव, श्रीवर्धन आदी तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे. मागील चोवीस तासामध्ये अलिबागमध्ये 170 मी. मी. मुरूडमध्ये 255 मी. मी. तळामध्ये 287 मि.मी. म्हसळामध्ये 273 मी. मी., श्रीवर्धनमध्ये 131 मी. मी., पनवेलमध्ये 90 मी. मी. पाऊस पडला आहे. या पावसामुळे अलिबाग, मुरूड तालुक्यातील नद्या, नाल्यांमधील पाण्याची पातळी वाढ झाली.

पनवेल तालुक्यातील तोंडरे येथे काही घरांमध्ये पाणी शिरून नुकसान झाले. रात्रीपासून पावसाचा जोर सुरु राहिल्याने अनेक घरांमध्ये पाणी शिरले. अलिबाग तालुक्यातील नागाव, बूरूमखान, चौल, नेहुली, मुळे, बामणोली, राजमळा, महाजने, रामराज, भिलजी बोरघर, या गावांमधील काही घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे घरातील अनेक वस्तूंचे प्रचंड नुकसान झाले. मुरूड तालुक्यातील चिखणी येथील पुलाला भगदाड पडले आहे. दुपारी काही प्रमाणात पावसाने विश्रांती घेतली. पावसाचा जोर कमी झाल्याने पाण्याची पातळी कमी झाली होती. मात्र दुपारनंतर पावसाची रिपरिप सुरुच होती. परिस्थिती नियंत्रणात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र रात्री पाऊस सुरु राहिल्यास नागरिकांनी सतर्क राहवे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले.

पीएनपी नगर, बस स्थानक पाण्याखाली

अलिबाग शहरातील अनेक भागात पाणी साचले होते. शहरातील पीएनपी नगरसह अनेक भागात पाणी साचल्याने वाहतूकीला अडथळा निर्माण झाला. एसटी बस स्थानकातदेखील पाणी साचल्याने प्रवाशांसह नागरिकांचे प्रचंड हाल झाले. पोलीस मुख्यालयाच्या परिसरात झाड उमळून कोसळले.नगरपरिषदेच्या कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेऊन ते झाड काढून रस्ता वाहतूकीला मोकळा केला.

अखेर तलाठी महिला लागली कामाला

अलिबाग – पेण मार्गावरील राऊतवाडी जवळील एक झाड रस्त्यावरच कोसळले. या घटनेची माहिती महिला तलाठी शिर्के यांना मिळाली. त्यांनी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी धाव घेतली. एका बाजूला पडत असलेला पाऊस त्यात झाडांच्या फांद्या तोडण्यासाठी कामगार बोलविणार कसे असा प्रश्‍न त्यांना निर्माण झाला होता. अखेर त्यांनी हातात कोयता घेऊन झाडांच्या फांद्या तोडल्या. स्वतः पुढाकार घेऊन जनतेच्या हितासाठी त्यांनी झाडांच्या फांद्या तोडून एक बाजूचा रस्ता मोकळा केला. त्यानंतर जेसीबीच्या मदतीने झाड बाजूला घेऊन रस्ता पुर्णपणे वाहतूकीला सुरु केला.

दुचाकी गेली वाहून

जिल्ह्यात रविवारपासून मुसळधार पावसाने सुरुवात केली आहे. हवामान विभागाकडून जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केला आहे.या पावसात नागाव परिसरात पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अलिबाग- रेवदंडा मार्गावरील पाल्हे पुलावरून पाणी वाहू लागले. दरम्यान एक दुचाकी पुलावरून वाहून गेली. या मार्गावरून नागरिकांनी प्रवास टाळावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले. जोरदार पावसामुळे नागावमध्ये भीमेश्‍वर तळ्याची भिंत देखील कोसळली आहे.

रामराज गावात पाणी


रात्रीपासून सुरु असलेल्या पावसाने धुमाकूळ घातला. रामराज नदीला पुर आला होता. त्यामुळे रामराजसह बोरघर येथील अनेक घरांमध्ये तीन ते चार फुट उंच पाणी शिरले. घरातील वस्तूंचे प्रचंड नुकसान झाले. तसेच कुंठ्याची गोठीमधील काही घरांमध्ये पाणी शिरल्याने वित्तहानी झाली. याबाबत बामणगावचे ग्रामसेवक व तलाठ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून पंचनामे केली.

महाडमधील दोन कुटूंब स्थलांतरित

महाड तालुक्यातील बिरवाडीमधील भैरवनाथ नगर येथील अंतर्गत नाल्याची संरक्षक भिंत कोसळली.नाल्यालगत असणारे अभिजीत मोरे यांच्या मालकीची दुमजली आरसीसी इमारत धोकादायक स्थितीत असून इमारतीमधील दोन कुटूंबातील पाच व्यक्तींना नामदेव म्हामुणकर यांच्या घरी तात्पूरत्या स्वरुपात स्थलांतरीत केले आहे. महाड नवेनगर येथील महाड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या गोडावूनमधील एका बाजूची भिंत कोसळली आहे. भिंती शेजारी असणारी पिठाची चक्की भिंती खाली गेली आहे.

आगारदांडा-इंदापूर मार्गावर मातीचा ढिगारा

रात्रीपासून सुरु असलेल्या पावसामुळे मुरूड तालुक्यातील आगारदांडा-इंदापूर मार्गावर डोंगराचा मातीचा ढिगारा आला होता. त्यामुळे वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला होता. प्रशासनाने तातडीने मातीचा ढिगारा जेसीबी व अन्य साहित्यांच्या मदतीने तातडीने काढून रस्ता वाहतूकीला मोकळा केला.

एनडीआरएफ पथक सज्ज

रात्रीपासून पावसाने जोर धरल्याने नदीसह रस्त्यावर प्रचंड पाणी साचले. वादळी वार्‍यासह पाऊस कोसळू लागला. अलिबाग-पेण मार्गासह अलिबाग रोहा मार्गावरील दूतर्फा असलेली झाडे कोलमडून पडली. मुसळधार पावसाचा इशारा असल्याने प्रशासनानेसोमवारी जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर केली. असाच पाऊस सुरु राहिल्यास दरड कोसळ्याबरोबरच पुरपरिस्थिती निर्माण होण्याची भिती आहे. त्यामुळे मदतीसाठी एनडीआरएफ पथक सज्ज असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. या कालावधीत तात्काळ सेवा देण्यासाठी शासकीय यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला.

किल्ल्यावर प्रवेश बंद


रायगड किल्ला पाहण्यासाठी पर्यटक दाखल झाले होते. रविवारी दिवसभर सुरु असलेल्या पावसामुळे पर्यटक त्याठिकाणी अडकले होते. प्रशासनाह स्थानिकांच्या मदतीने रोप वेच्या मदतीने त्यांना सुरक्षीत बाहेर काढण्यात आले. अतिवृष्टीमुळे जिवीतहानी टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाने कडक पाऊल उचलले आहे. रविवारी रात्रीपासून रायगड पोलीसामार्फत पर्यटकांसाठी किल्ला बंद करण्यात आला आहे. किल्ल्यावर जाणारा चित्त दरवाजा व नाणे दरवाजा मार्ग बॅरिकेट लावून बंद केला आहे. रोप वे ने किल्ल्यावर जाण्यासाठीदेखील बंदी घालण्यात आल्याची माहिती रायगड पोलिसांनी दिली.

Exit mobile version