जिल्ह्यात मुसळधार पाऊस

सखल भागात पाणी साचले

| खास प्रतिनिधी | रायगड |

रायगड जिल्ह्याला हवामान विभागाकडून रविवारी रेड अलर्ट देण्यात आल्याने पाऊस सकाळपासून बरसत होता. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. सकल भागात पाणी साचल्याने नागरिकांची गैरसोय झाली. रविवार असल्याने शाळा, महाविद्यालये, बँका, सरकारी, निमसरकारी कार्यालये बंद होती. त्यामुळे नागरिकांनी घरातच राहणे पसंत केले. 26 आणि 27 रोजी ऑरेंज अलर्ट, तर 28 आणि 29 ऑगस्टला यलो अलर्ट असल्याने पुढील चार दिवस पाऊस राहणार आहे.

24 ऑगस्ट रोजीदेखील रेड अलर्ट असल्याने पावसाचा जोर वाढला होता. तो रविवारीदेखील कायम होता. सकाळपासून पाऊस बरसत होता. त्यामुळे सकल भागात पाणी साचल्याने बाजारहाट करण्यासाठी आलेल्या नागरिकांची चांगलीच गैरसोय झाली. गेल्या काही दिवसांपूर्वी अलिबागसह शेजारील ग्रामपंचायतींमधील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यात आले होते. मात्र, पडलेल्या पावसाने आता खड्यांमध्ये आणखीन भर पाडली आहे. संबंधीत यंत्रणेने खड्डे बुजवण्याचा दिखाऊपणा तर केला नाही ना, असा प्रश्‍न आहे.

जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये पाऊस बरसत होता. पाऊस पडल्याने शेतकरी खुश आहे. शेतीसाठी अजून पावसाची गरज आहे. हवामान विभागाकडून 26,27 ऑगस्टला जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. 28 आणि 29 ऑगस्टला यलो अलर्ट आहे. त्यामुळे पुढील चार दिवस पावसाचे राहणार आहेत.

Exit mobile version