परतीच्या पावसामुळे भातशेतीचे नुकसान

शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण

| तळा | प्रतिनिधी |

परतीच्या पावसामुळे तळा तालुक्यातील भातपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. तळा तालुक्याचा भाग हा अधिक प्रमाणात डोंगराळ वरकस भातशेतीचा आहे. यावर्षी लवकरच सुरू झालेल्या पावसामुळे तळा तालुक्यातील शेतकरी वर्गाने आपली शेतीची कामे लवकरच पूर्ण केली होती. त्यानुसार यावर्षी पिकदेखील लवकर येईल अशी अपेक्षा शेतकरी बांधवांना होती. मात्र सप्टेंबर महिना संपत आला तरीदेखील पावसाने जोरदार बरसने सुरू ठेवल्याने तालुक्यातील बहुतांश भातशेती पाण्याखाली जाऊन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

सप्टेंबर महिना संपत आला असून बरेचशे शेतकरी ऑक्टोबर महिन्यात भात कापणीला सुरुवात करतात. मात्र परतीच्या पावसामुळे भातकापणी लांबणीवर गेली आहे. दिवसेंदिवस सायंकाळच्या सुमारास पावसाचा जोर कायम रहात असल्यामुळे उरलेल्या भातशेतीचेदेखील मोठे नुकसान होत आहे. हातातोंडाशी आलेला घासदेखील हिरावून जातो की काय, अशी भीती बळीराजाला वाटू लागली आहे. सतत दोन दिवस मुसळधार कोसळणाऱ्या परतीच्या पावसामुळे उभे पिक शेतात आडवे झाले आहे. परिणामी येथील शेतकरी चिंतातूर झाला आहे.

परतीच्या पावसामुळे तळा तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. वर्षभर काबाडकष्ट करून फुलविलेली शेती परतीच्या पावसामुळे उध्वस्त झाली आहे. शेती पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. त्यामुळे प्रशासनाने तळा तालुक्यातील नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करून तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आहे.

– चंद्रकांत राऊत, अध्यक्ष, तळा तालुका शेतकरी संघटना

Exit mobile version