तालुक्यातील 320 हेक्टर भात रोपवाटिका पाण्याखाली; कृषी विभागाकडून पंचनामे आणि पाहणी सुरू
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अलिबाग तालुक्यातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, सुमारे 320 हेक्टर क्षेत्रावरील भात रोपवाटिका पाण्याखाली गेल्याची प्राथमिक माहिती कृषी विभागाने दिली आहे. सततच्या पावसामुळे सखल भागात पाणी साचल्याने भाताची रोपे कुजून गेली असून, शेतकऱ्यांसमोर पुन्हा लागवडीचे संकट उभे राहिले आहे.
जून महिन्याच्या अखेरीस पावसाने जोर धरल्यानंतर तालुक्यात भात पेरणी आणि रोपवाटिका तयार करण्याच्या कामाला वेग आला होता. मात्र त्यानंतर झालेल्या मुसळधार पावसामुळे अलिबाग, रामराज, रेवस, पोयनाड, रेवदंडा आदी परिसरातील शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले. नदी-नाल्यांना पूर आल्याने सखल भागातील भात रोपवाटिका पूर्णपणे पाण्याखाली गेल्या.
अलिबाग तालुक्यात भाताचे सर्वसाधारण क्षेत्र 11 हजार 428 हेक्टर असून, यंदा 902 हेक्टर क्षेत्रावर भात रोपवाटिका तयार करण्यात आली होती. त्यापैकी सुमारे 320 हेक्टर क्षेत्रावरील रोपवाटिका अतिवृष्टीमुळे बाधित झाल्याची प्राथमिक नोंद कृषी विभागाने केली आहे. दरम्यान, मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे फळबागांचेही मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी नारळ आणि सुपारीच्या झाडांच्या फांद्या तुटल्या असून, काही झाडे उन्मळून पडली आहेत. विशेषतः चौल परिसरातील नारळ आणि सुपारी उत्पादकांना याचा मोठा आर्थिक फटका बसला आहे.
नुकसानीचे अंतिम प्रमाण निश्चित करण्यासाठी कृषी विभागाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष शेतभेटी घेऊन पाहणी सुरू आहे. मंडळ अधिकारी आणि कृषी अधिकारी शेतकऱ्यांशी संवाद साधून नुकसानीची माहिती संकलित करत असून, पुढील कृषी उपाययोजनांबाबत मार्गदर्शनही करण्यात येत आहे. नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर शासनाकडे अहवाल सादर करण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.
