अतिवृष्टीचा महावितरणला फटका

सुमारे दीड कोटी रुपयांचे नुकसान

| अलिबाग | प्रमोद जाधव |

जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरु झालेल्या पावसाने जिल्ह्यात धुमाकूळ घातला. 25 जुलैपर्यंत पडलेल्या या पावसात महावितरण कंपनीचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे अनेक गावांना अंधारात राहण्याची वेळ आली. अतिवृष्टीमुळे विद्युत तारा, रोहित्र, खांबांचे नुकसान होऊन महावितरणला एक कोटी 65 लाख रुपयांचा फटका बसला.

रायगड जिल्ह्यामध्ये वाढते नागरीकरणाबरोबरच पर्यटनामुळे विजेचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आहे. शहरापासून ग्रामीण भागात ठिकठिकाणी विजेचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. सर्वसामान्य ग्राहकांपासून व्यावसायिक व उद्योजकांकडून विजेचा वापर होत आहे. विजेअभावी नागरिकांचे प्रचंड हाल होतात. रायगड जिल्ह्यामध्ये जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून पावसाने सुरुवात केली. हा पाऊस असाच सुरु राहिला. त्यानंतर काही दिवस विश्रांती घेतली. त्यानंतर पुन्हा 10 जुलैपासून पुन्हा सक्रीय झाला. पावसाने धुमाकूळ घातल्याने जिल्ह्यातील महावितरण कंपनीला त्याचा फटका मोठ्या प्रमाणात बसला. अतिवृष्टीमुळे उच्चदाब वाहिनीचे 90 विद्युत खांब, लघु दाब वाहिनीचे 210 खांब व 71 रोहित्रं खराब झाले. सहा ठिकाणी रोहित्र पडले. या पावसामुळे सुमारे 25 किलोमीटर अंतरापर्यंत तारा तुटल्याने त्याचा फटका अनेक गावांना बसला. विजेअभावी अनेक गावांना अंधारात राहण्याची वेळ आली. या पावसामध्ये 1 कोटी 65 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

अतिवृष्टीमुळे महावितरण कंपनीचे पेण मंडळ कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात असलेल्या विद्युत यंत्रणेचे 165 लाख रुपयांचे नुकसान झाले. 300 विद्युत खांबांसह 71 रोहित्रं खराब झाली. ती बदलण्यात आली आहेत. पाऊस, वाऱ्यामुळे विद्युत वाहिनीच्या 25 किलोमीटर अंतरापर्यंत तुटलेल्या तारा जोडण्यात आल्या आहेत. ग्राहकांना पूर्ववत सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

आय.ए. मुलाणी, अधीक्षक अभियंता
Exit mobile version