पाऊस पडण्याचा अंदाज
| रत्नागिरी | वृत्तसंस्था |
गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मेटाकुटीस आलेल्या आंबा, काजू बागायतदारांची चिंता आणखी वाढण्याची चिन्हे निर्माण झाली असून जिल्ह्यात 29 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर या कालावधीत पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. या पावसामुळे बागायतदारांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. बुधवारी दिवसभर जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते.
जिल्ह्यात 24 नोव्हेंबरपासून पावसाचे वातावरण असून सलग दोन-तीन दिवस विजांच्या कडकडाटांसह जोरदार पाऊस झाला. सावंतवाडी, कुडाळ, मालवण, ओरोससह जिल्ह्याच्या अन्य काही भागात पाऊस झाला. पालवी आणि मोहोर स्थितीत असलेल्या आंबा, काजूकरिता हा पाऊस हानीकारक मानला जात आहे. याशिवाय दिवसभर असलेल्या ढगाळ वातावरणाचा मोठा परिणाम फळबागांवर होणार आहे. त्यामुळे पावसाची उघडीप मिळताच बागायतदार आंबा, काजू पिकांवर किटकनाशकांची फवारणी करण्याच्या तयारीत होते.
हवामान विभागाने 29 नोव्हेंबर ते 1 डिसेंबरपर्यंत पाऊस पडण्याचा अंदाज दिला आहे. त्यामुळे आंबा, काजू बागायतदारांचे तोंडचे पाणी पळाले आहे. आंबा, काजू पिकांवर सध्या टी मॉस्कीटोचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. फवारण्याअभावी त्यामध्ये वाढ होणार आहे. पावसामुळे शेतकऱ्यांनी फवारणी करणे टाळले आहे. त्यातच आता पुन्हा तीन दिवस पाऊस पडण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांना फवारणी करणे शक्य होणार नाही. तीन दिवस पाऊस पडल्यास आंबा, काजू बागायतदारांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता.
वेगवान वाऱ्याचा अंदाज जिल्ह्यात 29 ते 1 डिसेंबर या कालावधीत विजांच्या लखलखाटांसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असून प्रतिताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
जिल्ह्यात आंबा, काजूला पालवी आणि मोहोर फुटण्याची प्रकिया सुरू आहे. परंतु, गेल्या पाच सहा दिवसांत जिल्ह्यातील काही भागात पाऊस आणि ढगाळ वातावरण राहिले आहे. त्यामुळे आंबा, काजू पिकांवर करपा, टी मॉस्कीटो, तुडतुड्यांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पावसाची उघडीप पाहुन विद्यापीठाने शिफारस केलेल्या किटकनाशकांची फवारणी करावी.
मुळदे कृषी संशोधन केंद्र