अतिवृष्टीने घर हिरावले! आता झोपायचं कसं; चिमुकलीचा बाबांना प्रश्‍न

शिरगांव आदिवासी वाडीतील घर कोसळल्याने, ग्रामस्थांमध्ये भीतीचे सावट

। महाड । प्रतिनिधी ।
महाड तालुक्यातील शिरगांव आदिवासी वाडी महाड शहरापासून हाकेच्या अंतरावर असून, शिरगांव आदिवासी वाडी येथील चंद्रकांत पांडू वाघमारे यांचे घर अतिवृष्टीमुळे सोमवारी (दि.21) रात्री 10 वाजता कोसळले.

यावेळी विजय मुकणे, लता मुकणे, आरती मुकणे, शांती मुकणे व पांडू वाघमारे व छोटया मुलीचा देखील यामध्ये समावेश होता.हे कुटुंब त्या कोसळलेल्या घरात अडकले होते. ही घटना झाली त्यावेळी घटनास्थळी ग्रामस्थ व शिरगांवमधील मुलांनी धाव घेतली. अडकलेल्या सर्व कुटुंबाला सुखरूप बाहेर काढले.

जीवितहानी टळली. कोणालाही मोठी दुखापत झाली नाही. सदर घरकुल 25 वर्षांपूर्वीचे असून दुरुस्तीसाठी या आदिवासी गरीब समाजाकडे पैसा नसल्याने आज ही परिस्थिती झाली आहे. हे कुटूंब मासेमारी करून आपले पोट भरीत आहेत. शासनाने या गरीब कुटुंबाला घर बांधण्यासाठी आर्थिक मदत करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

Exit mobile version