महाडमध्ये वादळी पावसाने केले जनजीवन विस्कळीत

। महाड । प्रतिनिधी ।
संपूर्ण दिवसभर महाडमध्ये तापमानाचा पारा चढलेला असताना अचानक महाड शहर आणि परिसराला संध्याकाळी चार वाजल्या पासून सोसाट्याचा वारा आणि विजेच्या कडकडाटांसह गारांच्या पावसाने संपूर्ण महाड शहर आणि परिसराला झोडपून काढले. पावसाने अचानक हजेरी लावल्याने नागरिकांची धावपळ झाली व त्याचबरोबर जनजीवन विस्कळीत झाले.

सोमवारी (दि. २५) सकाळपासूनच अंगाची ल्हाई ल्हाई होत होती. दुपारी पारा ४२ डिग्री पर्यंत पोहचला असताना अचानक ४ वाजताच्या सुमारास संपूर्ण महाड औद्योगिक परिसर तसेच शहर आणि इतर ग्रामीण भागात सोसाट्याचा सुटलेला वारा आणि विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने सुरूवात केली. काही वेळातच गारादेखील पडू लागल्या. सुरूवातीला सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच वीटभट्टी आणि आंबा पिकाचे नुकसान झाले. महाड तालुक्यात अवकाळी पावसाचा विपरीत परिणाम झाला असून आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच तालुक्यामध्ये सुमारे 40 पेक्षा अधिक वीटभट्टी कारखानदारांचे नुकसान झाले. सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसामुळे तालुक्यातील बहुतांशी गावाचा वीजपुरवठादेखील खंडित झाला आहे.

Exit mobile version