माथेरानमध्ये पावसाचा जोर; नागरिकांची दाणादाण

| माथेरान | वार्ताहर |
माथेरान शहरात मागील पाच दिवसांपासून पावसाचा जोर कायम असून या पडणार्‍या जोरदार पावसामुळे माथेरानकरांची चांगलीच दाणादाण उडवून दिली आहे. गेल्या 24 तासात 217 मि.मी पावसाची नोंद करण्यात आली आहे.प्रशासन सतर्कतेमुळे कोणतीही हानी झाली नाही. गुरुवारही अतिवृष्टी होणार असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आल्यानंतर माथेरान स्थानिक प्रशासनाने सोशल मीडियावरून स्थानिकांना अलर्ट केले गेले. माथेरान नगरपरिषद मुख्याधिकारी सुरेखा भणगे , अधीक्षक दिक्षांत देशपांडे,पोलीस निरीक्षक शेखर लव्हे ,वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी उमेश जंगम ही सर्व अधिकारी मंडळी परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. दोन दिवस पावसाचा जोर अधिक वाढल्यामुळे हॉटेल,रेस्टॉरंट आणि दुकानातून चक्क पाण्याचे झरे वाहताना दिसत होते.गटारे,नाले तुडुंब भरून वाहत असून पावसाचे पाणी सर्वत्र रस्त्यावरून वाहताना दिसत होते.तसेच डोंगरावर जिकडे तिकडे सफेद दुधाळलेले झरे वाहताना दिसत होते.

मिनीट्रेनच्या जादा फेर्‍या
अतिवृष्टी आणि वादळी वारा वाहत असताना देखील माथेरानची राणी मिनीट्रेन आपले मार्गक्रमण करीत येथे आलेल्या पर्यटकांना अमन लॉज ते माथेरान सेवा पुरवीत होती.अमन लॉज ते माथेरान स्टेशन या मिनिट्रेनच्या फेर्‍या अनकट सुरू होत्या.पर्यटक सुद्धा या दिवशी माथेरान मध्ये दाखल झाले होते.त्यांनी या माथेरानच्या राणीचा प्रवास करण्याचा आंनंद लुटला. त्यामुळे मिनिट्रेनच्या फेर्‍या भरून जात होत्या.या अतिवृष्टीत मिनीट्रेनचा आधार मिळाल्याने पर्यटकांनी मध्य रेल्वेचे आभार सुद्धा मानले.

एक ते दोन ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडल्या परंतु सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा दुर्दैवी घटना घडली नाही. परंतु येथील महात्मा गांधी रस्त्यावरील वनविभाग कार्यालयाजवळ असलेल्या जनित्रावर झाड कोसळल्याने माथेरान शहराचा वीज पुरवठा खंडित झाला होता.तर ते कोसळलेले झाड काढण्याचे काम वीज वितरण कंपनीच्या कर्मचार्‍यांकडून युद्धपातळीवर जोरदार भर पावसात सुरू होते अशी माहिती वीज वितरण कंपनीचे अभियंता संतोष पादिर यांनी दिली.

माथेरानला ज्या ठिकाणी झाडे पडली आहेत त्याठिकाणी आपत्ती व्यवस्थापनाचे कर्मचारी झाड हटविण्याचे काम करीत आहेत.जोरदार पाऊस होऊनही कुठेही हानी झाली नाही.

दिक्षांत देशपांडे,अधिक्षक माथेरान
Exit mobile version