पोलादपूरला तुफानी पाऊस

तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा अवकाळी

| पोलादपूर | प्रतिनिधी |

गेल्या आठवड्याच्या अखेरीस सलग तीन दिवस अवकाळी पावसाने हजेरी लावल्यानंतर तीन दिवसांची विश्रांती घेतली होती. आता पुन्हा अवकाळी सक्रीय झाला असून, पोलादपूर शहराच्या परिसरात तुफानी पाऊस सुरू झाल्याने वादळामुळे तसेच झाड कोसळून घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. या पावसामुळे महावितरणच्या विद्युतवाहिनी तारा तुटल्याने वीजप्रवाह खंडित झाला, तर अनेक ठिकाणी घरांची कौले उडाली आहेत.

पोलादपूर तालुक्यात तीन दिवस सलग पावसाने हजेरी लावल्यानंतर आंबा बागायतदार शेतकर्‍यांचे नुकसान केले. मात्र, तीन दिवसानंतर अवकाळी पावसाने सलग तीन दिवस विश्रांती घेतल्याने पोलादपूरकरांनी सुस्कारा सोडला. परंतु, अवकाळीने पोलादपूरमध्ये रविवारी सायंकाळी पुन्हा हजेरी लावली आणि शहरातील पिंपळपार ते फौलादजंगदरम्यानच्या रस्त्यावर एक झाड कोसळले. सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या कर्मचारी वसाहतीवर महाकाय वृक्ष कोसळून सरकारी खोल्यांचे नुकसान झाले. सुदैवाने तेथील कर्मचारी व त्यांचे कुटुंबिय बचावले, तर चरई येथील एका कुटुंबाच्या घराचे छप्पर वार्‍याने उडाल्याने नुकसान झाले आहे.
महावितरणकडून मान्सूनपूर्व कामांची सुरूवात झाली असतानाच अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे ग्रामीण भागातील विद्युतपुरवठा करणार्‍या वीजवाहक तारा तुटून तसेच विजेचे खांब वाकून विद्युतपुरवठा बंद झाला. महावितरण आणि महापारेषणच्या कर्मचार्‍यांनी या बिघाडावर तातडीने काम सुरू करून 24 तासांच्या कालावधीत विद्युतपुरवठा सुरळीत करण्यात यश मिळविले.

Exit mobile version