पुण्यात पावसाचा हाहाकार

32 वर्षांमधील विक्रमी पाऊस; नागरिकांच्या मदतीसाठी लष्काराला पाचारण

| पुणे | प्रतिनिधी |

पुण्यासह राज्यभरात पावसाने धुमाकूळ घातला असून, अनेक जिल्ह्यांमध्ये हाहाकार माजवला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुण्यातील अनेक रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलं आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरलं आहे. तर काही भागात जनजीवनदेखील विस्कळीत झालं आहे. लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी प्रशासन कामाला लागलं आहे. नागरिकांच्या बचावासाठी आणि त्यांना सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी भारतीय लष्कराची तुकडी तैनात करण्यात आली आहे. गेल्या 32 वर्षांमध्ये पहिल्यांदाच इतका पाऊस झाला असल्याची माहिती हवामान तज्ज्ञ अनुपम कश्यपी यांनी दिली आहे.

पुण्याच्या नागरी प्रशासनाने केलेल्या विनंतीवरुन लष्कराच्या बचाव आणि मदत कार्य पथकाने एकता नगरच्या दिशेने प्रयाण केले आहे. या पथकामध्ये लष्कराचे जवान, अभियांत्रिकी कृती दल तसेच वैद्यकीय अधिकार्‍यांचा समावेश असून या पथकासोबत आपत्तीने प्रभावित लोकांना मदत करण्यासाठी तसेच तत्पर आणि परिणामकारक मदतकार्यासाठी आवश्यक बचाव बोटी आणि अत्यावश्यक वैद्यकीय सेवा देण्यासाठी टीम सज्ज करण्यात आली असल्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

लष्कराची 85 जणांची टीम तैनात
तसेच लष्कराच्या अतिरिक्त पथकांना सज्ज ठेवण्यात आले असून वेळ आलीच तर अगदी कमी वेळात ही पथके आवश्यकता असेल तेथे त्वरित पोहोचू शकतील. भारतीय लष्कराच्या दक्षिण कमांडमधील अधिकारी नागरी प्रशासन तसेच इतर सरकारी संस्थांशी समन्वय साधत, परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. स्थानिक प्रशासनाकडून लष्कराच्या मदतीसाठी विनंती करण्यात आली. या विनंतीला प्रतिसाद देत लष्कराच्या कृती दलाला प्रभावित भागाकडे तातडीने पाठवण्यात आले. एकूण 85 जणांचा समावेश असलेल्या या पथकामध्ये लष्कराचे जवान, अभियांत्रिकी रेजिमेंट आणि लष्करी रुग्णालये तसेच इतर तज्ञ घटकांतील वैद्यकीय पथके सहभागी आहेत.
भारतीय सशस्त्र दले तयारीत
लष्कराचे जवान बचाव आणि मदतकार्यात संपूर्णपणे सहभागी झाले आहेत. गरज लागली तर मदतीसाठी भारतीय हवाई दलालादेखील सज्ज राहण्यास सांगितले आहे. या आपत्तीत नागरी प्रशासनाला मदत करण्यासाठी भारतीय सशस्त्र दले तयारीत आणि सुसज्ज आहेत.
चौघांचा दुर्दैवी मृत्यू
पुण्यात विजेचा धक्का लागल्याने तीन जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील भिडे पुलाजवळील घटना घडली आहे. अंडा भुर्जीचा स्टॉल सुरक्षित ठिकाणी नेत असताना दुर्दैवी घटना घडली. तर, ताम्हिणी घाटात एका छोट्या भोजनालयावर दरड कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला, तर दुसरा जखमी झाला आहे. लवासा परिसरातील एका बंगल्यात तीन जण चिखलात अडकल्याची भीती पोलिसांनी व्यक्त केली आहे.
कोणते पूल बंद?
पुणे महानगर पालिका हद्दीत बालेवाडी पूल, मुळा नदी पूल, संगम रोड पूल, होळकर पूल, संगमवाडी पूल, महर्षी शिंदे पूल, हडपसर- मुंढवा रोड पूल, मातंग पूल, येरवडा शांतीनगर येथील पूल, निंबजनगर पूल, मोई, व चिकली रस्त्यावरील इंद्रायणी पुल पावसामुळे पाण्याखाली गेले आहेत.
राज्यभरात एनडीआरएफची 11 पथके तैनात
राज्यात आतापर्यंत एनडीआरएफची 11 पथकं तैनात करण्यात आली आहेत. तर, 7 पथकं राखीव ठेवण्यात आली आहेत. त्यापैकी मुंबई व रत्नागिरीत प्रत्येकी दोन पथकं आहेत. ठाणे, पालघर, रायगड, कोल्हापूर, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत प्रत्येकी 1 पथक आहे. ही पथकं 31 ऑगस्टपर्यंत तैनात राहणार आहेत. तर, 7 पथके राखीव असून, ती सध्या मुंबई, पुणे व नागपूरमध्ये तळ ठोकून आहेत. तर, एसडीआरएफची 6 पथकं वेगवेगळ्या ठिकाणी तैनात करण्यात आली आहेत.
या जिल्ह्यांना रेड अलर्ट
रायगडसह मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, सातारा
या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
पालघर, अहमदनगर, रत्नागिरी, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड या सात जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे.
Exit mobile version