रायगड जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ; पूर परिस्थिती नियंत्रणात

दिनांक 11 जुलै 2021 रोजी सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे रायगड जिल्हयातील पूरपरिस्थितीचा अहवाल जिल्हा प्रशासनाने पाठविला आहे. त्यानुसार मौजे राजपुरी, ता. मुरूड येथील एका झोपडीवर दरड कोसळून नुकसान झाले आहे. यामध्ये जीवितहानी झालेली नाही. मौजे खारीकवाडा, नांदगाव, उसर्ली, बोर्लीनाका, आदाड या ठिकाणी अतिवृष्टीमुळे पूराचे पाणी भरले आहे. त्या ठिकाणी स्थानिक पथकाच्या व बचाव पथकाच्या मदतीने बचाव कार्य सुरू आहे.

मौजे काशिद, ता. मुरूड येथे अतिवृष्टीमुळे अलिबाग मुरूड मार्गावरील पूल वाहून गेला आहे. त्या दूर्घटनेत 1 व्यक्ती मयत झाली आहे. 2 व्यक्ती किरकोळ जखमी झाल्या आहेत, त्यांच्यावर उपचार करुन घरी सोडण्यात आले आहे.
मौजे केळघर आदिवासी वाडी, ता. रोहा येथे रोहा मुरूड रस्त्यावर दरड कोसळली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दरड हटविण्याचे काम सुरू आहे. रायगड पाटबंधारे विभागाच्या दि. 12 जुलै 2021 रोजीच्या सकाळी 10.00 वाजतच्या अहवालाप्रमाणे सर्व नदयांची पाणी पातळी इशारा पातळीपेक्षा कमी आहे. जिल्हयातील इतर तालुक्यातील पूर परिस्थिती नियंत्रणात असून स्थानिक प्रशासनाला सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.

Exit mobile version