रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांचे आदेश
| रायगड | प्रतिनिधी |
जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या रस्त्यांवरील पूल व स्लॅब कलवर्ट संरचनात्मकदृष्ट्या धोकादायक स्थितीत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी त्या पुलांवरून अवजड वाहनांच्या वाहतुकीवर तात्काळ बंदी घालण्याचे आदेश जारी केले आहेत. Vijna Consulting Engineers Pvt. Ltd. संस्थेमार्फत करण्यात आलेल्या स्ट्रक्चरल ऑडिट अहवालानुसार अलिबाग-रोहा, अलिबाग-रेवदंडा, पोयनाड-उसर-भादाणे व भाकरवड-देहेन या मार्गांवरील एकूण 8 पुलांची भार क्षमता अत्यल्प (5 ते 16 टन) असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अवजड वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग
अलिबाग- रोहा रस्त्यावरून होणाऱ्या अवजड वाहतुकीसाठी अलिबाग, पेझारी नाका, कुर्डूस वेलशेत, आंबेघर, भिसे खिंड मार्गे रोहा पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आले आहेत. अलिबाग-रेवदंडा आणि पोयनाड-उसर-भादाणे या रस्त्यावरून होणाऱ्या अवजड वाहतुकीसाठी अलिबाग- उसर- वावे मार्गे -रेवदंडा तर भाकरवड-देहेन रस्त्यावरून होणाऱ्या अवजड वाहतुकीसाठी पांडवा देवी- पोयनाड- पेझारी- श्रीगाव मार्गे- देहेन या रस्त्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.
पावसाळ्यामुळे पूल अधिक असुरक्षित झाल्याने वाहनचालकांनी व ट्रान्सपोर्ट संस्थांनी प्रशासनाच्या आदेशाचे काटेकोर पालन करावे. अपघात टाळण्यासाठी व जनतेच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही कार्यवाही करण्यात आली आहे. पुढील आदेश येईपर्यंत या आठ पुलांवरील अवजड वाहतूक बंदचे आदेश लागू राहणार आहेत. नियमभंग करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्यात येईल.
किशन जावळे
जिल्हाधिकारी रायगड







