साळाव पुलावरून अवजड वाहतूक सुरूच

पुलाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

| रेवदंडा | प्रतिनिधी |

साळाव पुलावरून सुरू असलेल्या अवजड वाहतुकीमुळे पुलाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रवासीवर्गातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

गेल्या दोन-तीन महिन्यांपासून रेवदंडा परिसरातील कुंडलिका खाडीमध्ये रो-रो सेवेसाठी भराव टाकणे आणि जेट्टी उभारण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी लागणाऱ्या साहित्याची वाहतूक प्रामुख्याने रात्रीपासून पहाटेपर्यंत साळाव पुलावरून मालवाहतूक ट्रकद्वारे केली जात आहे. मात्र, सुमारे 35 ते 40 वर्षे जुना असलेला हा पूल एवढ्या मोठ्या प्रमाणातील अवजड वाहतूक सहन करू शकणार नाही, अशी भीती स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.

सार्वजनिक बांधकाम विभागाने यापूर्वीच या पुलावरून अवजड वाहतुकीस बंदी घातल्याचे सांगितले जाते. तरीही 20 ते 24 टन क्षमतेचे ट्रक आणि काही ठिकाणी 35 ते 40 टन माल घेऊन दहा चाकी ट्रक पुलावरून वाहतूक करत असल्याचा आरोप प्रवासीवर्ग करत आहे.

अलीकडेच पुलाची दुरुस्ती व देखभाल करण्यात आली होती. त्या काळात अवजड वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती. काम पूर्ण झाल्यानंतर केवळ 12 टन क्षमतेपर्यंतच्या वाहनांनाच परवानगी देण्यात आली होती. मात्र, सध्या या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे.

अलिबाग, मुरूड आणि रोहा या तीन तालुक्यांना जोडणारा साळाव पूल हा वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. या पुलामुळेच मुरूड तालुका पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित झाला आहे. त्यामुळे पुलाला धोका निर्माण झाल्यास पर्यटनावर तसेच स्थानिक अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होऊ शकतो.

यामुळे साळाव पुलावरून सुरू असलेली अवजड वाहतूक तात्काळ बंद करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि प्रवासीवर्गाकडून जोर धरत आहे.

Exit mobile version