Amba Ghat: आंबा घाटात अवजड वाहनांना बंदी

मुसळधार पावसामुळे रस्त्याला भेगा

। रत्नागिरी । प्रतिनिधी ।

मुसळधार पावसामुळे कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग क्र.166 वरील आंबा घाटातील रस्त्याला भेगा पडल्या आहेत. आंबा घाट हा तीव्र उतार, खोल दऱ्या आणि अतिवृष्टीमुळे दरडी कोसळण्यासाठी संवेदनशील भाग आहे. याच भागात रस्त्याला मोठे तडे गेले असून उताराची तीव्र धूप झाली आहे. यामुळे रस्त्याची सुरक्षितता धोक्यात आली आहे. त्यामुळे संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आंबा घाटातून जाणारी सर्व प्रकारची अवजड वाहतूक पुढील आदेशापर्यंत बंद करण्याचे आदेश रत्नागिरीचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष मनुज जिंदल यांनी दिले आहेत. केवळ अत्यावश्यक सेवेतील वाहने आणि हलकी प्रवासी वाहने नियंत्रित वेगाने आणि खबरदारी घेऊन या मार्गावरून प्रवास करू शकतील.​

पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन
अवजड वाहनांसाठी ‘रत्नागिरी-हातखंबा-पाली-अणुस्कुरा घाट-राजापूर/कोल्हापूर’ हा पर्यायी मार्ग घोषित करण्यात आला आहे. तसेच भुईबावडा किंवा फोंडा घाटाचाही पर्याय स्थानिक प्रशासनाने सुचवला आहे.

आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर होणार कारवाई
या आदेशाची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी रत्नागिरीच्या पोलीस अधीक्षकांना आंबा घाटाच्या दोन्ही प्रवेशद्वारांवर (चेक पोस्ट) आवश्यक पोलीस बंदोबस्त तैनात करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच, NHAI आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला बाधित ठिकाणी धोक्याची सूचना देणारे फलक, रिफ्लेक्टीव्ह बॅरिकेड्स आणि रात्रीच्या वेळी ब्लिंकर्स बसवण्याचे निर्देश दिले असून रस्त्याच्या दुरुस्तीचे काम प्राधान्याने पूर्ण करण्यास सांगितले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

Exit mobile version