| उरण | वार्ताहर |
लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या असून, मंगळवारी (दि. 4) मतमोजणी होत आहे. मुंबईतील शिवडी आणि दक्षिण मुंबई मतदारसंघाची मतमोजणी शिवडी बंदर परिसरात होणार आहे. त्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेसाठी अडथळा निर्माण होऊ नये म्हणून मंगळवारी सकाळी सहा ते संध्याकाळी सहापर्यंत अटल सेतू वाहतूक जड-अवजड वाहनांसाठी बंद असणार आहे, तर हलक्या वाहनांची वाहतूक सुरु असली तरी त्यांना शिवडी येथे थांबता येणार नाही.
वडाळा वाहतूक विभागाच्या हद्दीत शिवडी वेअर हाऊस, हे बंदर रोड, शिवडी पूर्व मुंबई येथे 31 दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ व 30 दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचा स्ट्रॉग रूम आहे. चार जून रोजी या ठिकाणी मतमोजणी असल्याने मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमा होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अटल सेतू शिवडीबाहेर जाण्याचा मार्ग (एक्झिट) येथे कोणत्याही प्रकारची अवजड वाहने तसेच मालवाहतूक करणारी वाहने यांना अटल सेतू दक्षिण वाहिनी येथून येण्यास मनाई करण्यात आली आहे. या मार्गावर हलकी वाहने येण्यास परवानगी असेल. परंतु, त्यांना शिवडी एक्झीट येथे उतरण्यास मनाई करण्यात आली असून, त्यांना थेट कुलाबा एक्झीट व वडाळा एक्झीट येथून पर्यायी मार्गाने वाहतूक करण्यास परवानगी आहे.
नवी मुंबई एमटीएनएल दक्षिण वाहिनी ते शिवडीबाहेर जाण्याचा मार्ग (एक्झीट) वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग अवजड वाहनासाठी पर्यायी मार्ग नवी मुंबई वाशी खाडी पूलमार्गे, तर हलक्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग-कुलाबा बाहेर जाण्याचा मार्ग (एक्झीट) व वडाळा बाहेर जाण्याचा मार्ग (एक्झीट) असणार आहे. सदरची वाहतूक नियंत्रण अधिसूचना ही इतर जीवनावश्यक वस्तू वाहून नेणारी वाहने तसेच पोलीस वाहने, अग्निशमन बंब, रुग्णवाहिका व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू होणार नाही.